शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार

मुंबई : दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान ठाकरे गटाला देण्याच्या निर्णयाविरुद्ध शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. उद्यापर्यंत याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.

हायकोर्टाने शिंदे गटाचे म्हणणे ऐकले नाही. तसेच सदा सरवणकरांची याचिका ही आमची शिवसेना ही खरी शिवसेना असल्याची होती. सदा सरवणकरांचे म्हणणे हायकोर्टाने ऐकून घेतले नाही, त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा गट सुप्रीम कोर्टात जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या सुप्रीम कोर्टात करण्यात येणाऱ्या याचिकेत आमची शिवसेना ही खरी शिवसेना आहे त्यामुळे आम्हाला शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा करण्याची परवानगी द्यावी, असे याचिकेत म्हटले आहे. तसेच ताबडतोब निर्णय घ्यावा, अशी मागणी देखील याचिकेत शिंदे गटाने केली आहे. हायकोर्टाच्या निकालाची अंतिम प्रत हातात आल्यानंतर आज किंवा उद्या याचिका दाखल करण्यात येणार आहे. अंतिम निर्णयाची कॉपी हातात आल्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती नरेश म्हस्के यांनी दिली आहे.