कळवा खाडीतील तिसऱ्या पुलाची एक मार्गिका नवरात्रोत्सवात खुली होणार

जितेंद्र आव्हाडांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

ठाणे : कळवा भागातील नागरीकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी खाडीवरील तिसऱ्या पुलाची एक मार्गिका तत्काळ सुरु करावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शुक्रवारी करण्यात आली. त्यावेळी ही मार्गिका नवरात्रोत्सवात सुरू करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

ठाणे आणि कळवा याला जोडण्यासाठी दोन खाडी पुल आहेत. त्यापैकी ब्रिटीशकालीन पुल धोकादायक झाल्याने तो काही वर्षांपुर्वीच वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. दुसऱ्या पुलावर वाहनांचा भार वाढून वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी कमी करण्यासाठी तिसरा खाडी पुल उभारण्यात येत आहे. डिसेंबर २०१९ मध्ये या पुलाच्या कामाची मुदत होती. त्यानंतर डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. विविध कारणाने पुलाचे काम रखडत असल्याचे दिसून आले. या संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना एक पत्न देऊन हा पुल लवकर वाहतूकीसाठी खुला करण्याची मागणी केली होती. तर, दुसरीकडे ठाणे महापालिकेने या पुलाचे काम महिनाभरात उरकून तो वाहतूकीसाठी खुला करण्याची तयारी सुरु केली होती. त्यानुसार या पुलावरील पोलीस आयुक्त कार्यालय ते कळवा नाका आणि ठाणे-बेलापूर रोड या एका मार्गिकेचे काम कोणत्याही परिस्थितीत ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी संबंधित ठेकेदाराला दिले होते. परंतु आता सप्टेंबर महिना संपत आला तरी देखील हा पुल वाहतुकीसाठी खुला होत नसल्याने अखेर शुक्रवारी आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील शुभदिप या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

या भेटीदरम्यान कळवा भागात राहणाऱ्या नागरीकांची वाहतुक कोंडीतून सुटका करण्यासाठी एक मार्गिका तत्काळ सुरु करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानुसार नवरात्रोत्सवाच्या कालावधीत ही मार्गिका खुली केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले असल्याची माहिती आव्हाड यांनी दिली.