स्वच्छता ही आपली जीवनशैली झाली पाहिजे – आयुक्त

हजारो ठाणेकरांच्या उपस्थितीत स्वच्छ अमृतमहोत्सवाचे उद्घाटन

ठाणे : स्वच्छता ही फक्त पंधरवड्यापुरती मर्यादित न राहता आपले ठाणे शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी स्वच्छता ही आपली जीवनशैली झाली पाहिजे असा, निर्धार प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्यासमवेत उपस्थित ठाणेकरांनी केला. या अमृत स्वच्छता महोत्सवात जवळ जवळ 18 हजाराहून अधिक ठाणेकरांनी आपला सहभाग नोंदविला.

केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार इंडियन स्वच्छता लीग हा स्वच्छता विषयक देशव्यापी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून अमृत स्वच्छता महोत्सवाचे उद्घाटन आज प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या हस्ते उपवन येथे झाले. यामध्ये अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका जयश्री डेव्हिड, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, बाळासाहेब चव्हाण, अनघा कदम, जी.जी गोदेपुरे, नगरअभियंता प्रशांत सोनाग्रा, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, प्रदूषण अधिकारी मनिषा प्रधान, वैद्यकीय अधिकारी बालाजी हळदेकर व सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त तसेच महापालिका अधिकारी कर्मचारी यांच्यासह शिक्षक, महाविद्यालयीन विद्यार्थी, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रत्येक नागरिकांनी स्वच्छता ही केवळ महापालिकेची जबाबदारी नाही तर ती प्रत्येक ठाणेकराची जबाबदारी आहे या भावनेने वागले तर आपले शहर हे नेहमीच स्वच्छ राहिल, त्यामुळे आपले शहर हे पंधरवड्यापुरता स्वच्छ न ठेवता ते नेहमीच स्वच्छ राहिल याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे असेही महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी नमूद केले.

स्वच्छ अमृत महोत्सवात आज सकाळी उपवन ते येऊर गाव या मार्गावर 7.5 कि.मी अंतराची सुमारे 7500 हजाराहू अधिक नागरिकांचा सहभाग असलेल्या मानवी साखळी तयार करण्यात आली होती. एक पाऊल स्वच्छतेकडे, माझे ठाणे स्वच्छ ठाणे, ठाण्यासाठी माझे योगदान अशा घोषणा या मानवी साखळी दरम्यान ठाणेकरांनी दिल्या. या मानवी साखळीत ठाणे महानगरपालिका शाळांतील विद्यार्थी व ठाणे शहरातील खाजगी शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सफाई मित्रांची सफाई दिंडी काढण्यात आली होती, या दिंडीत महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा सहभागी झाले होते.

उपवन येथील ॲम्पीथिएटर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ठाणे टायगर्स या लोगोचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच 15 स्वच्छता निरीक्षकांना स्मार्ट वॉचचे वाटप करण्यात आले यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात वासुदेव शिर्के, यासीन तडवी, धीरज चौधरी यांना स्मार्टवॉच महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच महिला बचतगटांना डस्टबीन व जॅकेटचे वाटप करण्यात आले. स्वच्छ अमृत महोत्सवात सहभागी झालेल्या दिव्यांग महेक माणिक या महिलेचा सन्मान यावेळी करण्यात आला. अक्षयपात्र फाऊंडेशनच्या माध्यमातून 10 शालेय विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. तसेच स्वच्छतेचे महत्व पटवून सांगणारे पथनाट्य आनंद विश्व गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी यावेळी सादर करुन ठाणेकरांची दाद मिळविली.

उद्यान व व्यायामशाळेचे उद्घाटन

सिडको येथील रेल्वेब्रीजखाली नागरिकांनी कचरा टाकू नये यासाठी या ठिकाणी गार्डन बनविण्यात आले आहे. या छोटेखोनी सुशोभित उद्यानाचे लोकार्पण तसेच चेंदणी कोळीवाडा येथे महिलांसाठी नव्याने खुली व्यायामशाळा बांधण्यात आली असून त्याचे लोकार्पण अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर, प्र.उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर व महापालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

कोरस आरोग्य केंद्र येथे तपासणी शिबिर

ठाणे शहर स्वच्छ ठेवण्यामध्ये कचरा वेचक महिलांचा मोठा वाटा आहे. स्वच्छ अमृत महोत्सव उपक्रमातंर्गत आज कचरा वेचक महिलांना टी- शर्ट व गम बूटचे वाटप करण्यात आले. तसेच कचरा वेचक महिलांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्यात आली. ठाणे महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

कचऱ्यातील अद्भुत जग

स्वच्छता अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिका व समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेच्या विद्यमाने कचऱ्यातील अद्भुत जग या आगळ्यावेगळ्या संग्रहालयाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. या संग्रहालयात नागरिकांनी कचऱ्यामध्ये टाकून दिलेल्या टिकावू व आगळ्यावेगळ्या वस्तू मांडण्यात आल्या आहेत.