ठाण्यात स्मार्ट जलमापकांना झोपडपट्ट्यांमध्ये नकारघंटा

फक्त ४० टक्केच योजना यशस्वी

ठाणे : व्यवसायिक तसेच गृहसंकुलांमध्ये स्मार्ट वॉटर मीटर योजना १०० टक्के यशस्वी झाली असली तरी झोपडपट्टी भागात मात्र आतापर्यंत ४० टक्केच स्मार्ट मीटर बसवण्यात आल्याची कबुली प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. सदोष बिलांमुळे झोपडपट्टी भागात नव्या मीटरला विरोध होत असल्याचे कळते.

नळ संयोजनांवर मीटर बसविण्यासाठी विविध पध्दतीने निविदा काढल्या होत्या. परंतु अखेर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मार्च २०१९ पासून मीटर बसविण्यास सुरवात झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून तब्बल एक लाख १३ हजार मीटर बसवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सुरुवातीला केवळ कमर्शियल आणि गृहसंकुलांना हे मीटर बसवण्याचे आदेश असताना तत्कालीन महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या कार्यकाळात मानपाडा परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात आले होते. केवळ मानपाडाच नव्हे तर आणखी काही झोपडपट्ट्यांमध्ये देखील स्मार्ट मीटर बसवण्यात आले. मात्र त्यावेळीही झोपडपट्टी भागातून स्मार्ट मीटर बसवण्याला विरोध झाला होता.

मार्च २०१९ पासून शहरात मीटर बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली असून आतापर्यंत ठाणे महापालिका क्षेत्रात ८६ हजार मीटर बसवण्यात आले आहेत. यामध्ये व्यवसायिक तसेच गृहसंकुलांमध्ये १०० टक्के मीटर बसवण्यात आले असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. झोपडपट्टी भागात मात्र अजूनही ही योजना पालिकेला प्रभावीपणे राबवता आलेली नसून आतापर्यंत केवळ ४० टक्केच स्मार्ट वॉटर मीटर बसवण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

स्मार्ट वॉटर मीटरमुळे वाढीव बिले

स्मार्ट मीटरच्या रिडींगप्रमाणे महापालिकेकडून ग्राहकांना देयके पाठविण्यास सुरुवात झाली असून ही देयके अवाजवी असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. यापुर्वी वर्षाकाठी दीड हजाराच्या आसपास देयक येत होते. परंतु आता तीन ते चार हजारांच्या आसपास तीन महिन्यांची देयके पाठविण्यात आल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. दरम्यान, साॅफ्टवेअरमधील तांत्रिक चुकांमुळे असा प्रकार घडत असून अशा तक्रारदारांच्या देयकात दुरुस्ती करून दिली जात असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. तक्रारीसाठी ९१५८०६६२२२ आणि ९१५८०६६१११ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.

पाणी गळती आणि पाणी चोरी रोखण्यासाठी तसेच पाण्याच्या बिलांची योग्य प्रकारे वसुली व्हावी या उद्देशाने हे स्मार्ट मीटर बसविले जात असून १३१ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. या कामासाठी स्मार्ट सीटी अंतर्गत 93 कोटींचा खर्च केला जात असून पुढील निगा आणि देखभालीसाठीचा पुढील पाच वर्षाचा खर्च हा पालिका करणार आहे. यासाठी खाजगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. या मीटरमुळे ग्राहक जेवढे पाणी वापरणार आहेत, तेवढेच बील त्यांना भरावे लागणार आहे.