आ. केळकर यांची भूमिका असलेले ‘विश्‍वनायक’ रंगमंचावर

ठाणे : ठाणे विधानसभा मतदार संघातील भाजपा आमदार संजय केळकर यांनी अभिनय केलेले स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील हिंदी नाटक ‘विश्‍वनायक’ गडकरी रंगायतन येथे सादर झाले. त्यास प्रेक्षकांनी उत्तम दाद दिली.

शिरीष लाटकर लिखित आणि प्रा. मंदार टिल्लू दिग्दर्शित या नाटकाची निर्मिती श्रध्दा सचिन मोरे यांनी केली आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारीत या नाटकात रामकृष्ण परमहंस यांची भूमिका आ.संजय केळकर यांनी प्रभावीपणे वठवली आहे. विवेकानंद यांची भूमिका निभावणार्‍या विकास पाटील यांचे कामही प्रेक्षकांची दाद मिळवून गेले.

या नाटकाचे अनेक प्रयोग व्हावेत अशी इच्छा निर्माते सचिन मोरे यांनी व्यक्त केली असून विद्यार्थ्यांना आपल्या या महान व्यक्तीमत्वाचे तत्वज्ञान समजावे हे या नाट्याकृतीमागचे ध्येय आहे. अशोक बागवे यांच्या गीतांना अशोक पत्की यांनी संगीत दिले आहे. प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची असून नाट्यप्रयोग खूप देखणा झाला आहे, असे रसिक प्रेक्षकांनी सांगितले.