एफडीएच्या कारवाईतून २० लाखांचा दंड वसूल

ठाणे : अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणे कार्यालयाने कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यात नवी दिल्लीच्या अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या आदेशानुसार विशेष मोहिम सुरु केल्यामुळे अन्न व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

ठाणे एफडीएने सुरु केलेल्या कारवाईमुळे तब्बल ४९ प्रकरणी २०  लाख २५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. नवी दिल्लीच्या प्राधिकरणाच्या आदेशानंतर 30 सप्टेंबर 2021 च्या आदेशाच्या अनुषंगाने 1 जानेवारी 2022 पासून विशेष मोहिमा राबविण्यात येत आहेत. त्या यापुढेही सुरू ठेवण्यात येणार आहेत. या मोहिमेत रोखीची पावती/ खरेदी इन्व्हाईस / कॅश मेमो / देयके (बिल) क्रमांक नमूद न करणा-या एकूण 198 अन्न व्यवसाय चालकांविरुद्ध न्यायनिर्णयासाठी खटले दाखल करण्यात आले. त्यापैकी एकूण ४९ प्रकरणी अंतिम निकाल होऊन सर्व संबंधितांना एकूण २० लाख २५ हजार रुपये एवढा दंड ठोठावण्यात आला आहे. उर्वरित 149 प्रकरणे लवकरच अंतिम निघाली काढण्यात येतील, असे कोकण विभागाचे सह-आयुक्त (अन्न) सुरेश देशमुख यांनी ‘ठाणेवैभव’ ला सांगितले.

कोणत्याही अन्न आस्थापनाबाबत आणि किंवा अन्नपदार्थ यांच्या दर्जा व गुणवत्तेबाबत कोणतीही शंका असल्यास प्रशासनाच्या 1800- 222 – 365 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सह आयुक्त देशमुख यांनी कोकण विभागातील रहिवाशांना केले आहे.