शिवसेनेचे दोन गट भिडले; शाखेवरून राजकारण पेटले!

मनोरमानगरमध्ये शाखेचा ताबा घेण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये गरमागरमी

ठाणे : घोडबंदर रोड येथील मनोरमा नगर येथे शिवसेना शाखेवरील फलक काढण्यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट समोरासमोर आल्याने या परिसरातील वातावरण तंग बनले होते. अखेर पोलिसांनी शाखेला टाळे लावले.

मनोरमनगर येथील शाखेवर उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र असलेला फलक शिंदे गट गटाने काढून त्याजागी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र असलेला फलक लावला होता. त्याची माहिती उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी आज दुपारी खा. राजन विचारे आणि शिवसेना जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली या शाखेचा ताबा घेऊन तेथे उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे यांचे छायाचित्र असलेला फलक लावला. शाखेत उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नवीन तसबीरी लावण्यात आल्या. या घटनेची माहिती मिळताच शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी नगरसेवक संजय भोईर, राम रेपाळे, रमाकांत मढवी, योगेश जानकर, राजा शिंदे हेमंत पवार, भूषण भोईर, शिवसेना महिला आघाडी प्रमुख मिनाक्षी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाचे कार्यकर्ते गोळा झाले होते. त्यांनी उद्धव ठाकरे गटाचा फलक काढून पुन्हा शिंदे गटाचा फलक लावला. त्यावरून दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. यावेळी या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही गट शाखेवर आपला दावा सांगत होते. अखेर पोलिसांनी दोन्ही गटाची समजूत काढून या शाखेला टाळे लावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वातावरण निवळले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त येथे वाढवला होता, त्यामुळे या भागाला छावणीचे स्वरूप आले होते.

आमच्या शाखेवर त्यांनी शिवप्रतिष्ठान आनंद आश्रम वाचनालय असा फलक लावला होता. तो आम्ही काढून टाकला, असे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सांगितले. तर बाळासाहेबांचा फोटो लहान आणि मुख्यमंत्र्यांचा फोटो मोठा असलेला फलक लावल्याने शिवसैनिक संतापल्याची प्रतिक्रिया खासदार राजन विचारे यांनी दिली. सत्तेचा गैरवापर करून शिवसैनिकांना त्रास देण्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून होत असल्याचा आरोपही श्री.विचारे यांनी केला.