नवी मुंबई : अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी अभिनित हेराफेरी चित्रपटाप्रमाणे नवी मुंबईतील एका सोनाराच्या दुकानावर दरोडा टाकण्यात आल्याची घटना घडली आहे.
कामोठे येथे नेपाळमधून आलेल्या तीन जणांनी दुकान भाड्याने घेऊन एक छोटे हॉटेल सुरु केले होते. या हॉटेलच्या बाजूलाच असलेल्या सोनाराचे दुकान होते. चोरट्यांनी शक्कल लढवत या दोन्ही दुकानांच्यामध्ये असलेल्या भिंतीला भगदाड पाडून दुकानातील १५ किलोंचा चांदीचा ऐवज लुटला आहे. याची किंमत जवळपास पाच लाख ८८ हजार आहे.
चोरट्यांनी चोरीच्या आठ दिवसांपूर्वी वाशी येथील एका रहिवाशाच्या मालकीचे दुकान भाड्याने घेतले होते. कारण ते दुकान सोनाराच्या दुकानाच्या बाजूला लागूनच होते. तसेच, चोरी करण्यापूर्वी त्यांनी दुकानाचे निरीक्षणही करुन ठेवले होते. जी भिंत फोडून ते दुकानात शिरले होते, तिथे लहान स्टोअर रुम असून तिथेच दागिने ठेवायची तिजोरी ठेवली होती. या तिजोरीत मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने ठेवले असतील, असा त्यांना विश्वास होता, अशी माहिती कामोठे पोलिस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांनी दिली.
ज्लेलरी दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या चोरट्यांनी चेहऱ्यावर फडका बांधून प्रवेश केल्याचे दिसत आहे. त्यांनी बाजूच्या दुकानाची व ज्वेलरी दुकानाच्या सामायिक भिंतीला मोठे भगदाड पाडले होते. त्या भगदाडातून ते दुकानात आत शिरले होते. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा सीसीटीव्ही कॅमेरा फोडून टाकला. दुकानातील दागिन्यांची तिजोरी फोडण्यासाठी त्यांनी हातोडा, धातूचा रॉड, स्क्रू ड्रायव्हर, स्पॅनर, ऑक्सिजन सिलेंडर, गॅस कटर, रेग्युलेटर आणले होते. चोरट्यांना लहान तिजोरी फोडण्यात यश आले होते. त्यांनी लहान तिजोरीतील सहा लाख रुपये किंमतीचे चांदीचे दागिने लंपास केले. गॅस सिलिंडर व कटरचा वापर करुन त्यांनी सोन्याचे दागिने असलेली तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा प्रयत्न असफल झाला. त्यामुळे त्यांनी सगळे सामान तिथेच ठेवून पळ काढला. पोलिसांनी या सर्व वस्तू ताब्यात घेतल्या आहेत.