लहान भावाच्या भांडणातील मध्यस्थी बेतली मोठ्या भावाच्या जीवावर

बदलापूर : लहान भावाच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या मोठ्या भावाच्या छातीत जोराने कोपरखळी मारून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बदलापूर पूर्वेकडील सेंट्रल हॉस्पिटलनजीक असलेल्या ज्यूस सेंटरमध्ये घडली आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पुष्कर धुळे (२९) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर शुभम विश्वास मोरे (२६) असे खून झालेल्या मोठ्या भावाचे नाव आहे. मृतक शुभमचा संगीतकार असलेला लहान भाऊ शिवम (२२) याचा १५ सप्टेंबर रोजी वाढदिवस असल्याने शिवम हा त्याच्या मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी साजरी करून कात्रप रोडने घराच्या दिशेने दुचाकीवरून येत होता. त्यावेळी वाटेतच बदलापूर पूर्वेकडील सेंट्रल हाँस्पिटलनजीक असलेल्या आरोपी पुष्करच्या ज्यूस सेंटरमध्ये त्याचा मित्र विशाल हा आरोपीशी बोलत असताना विशालला आवाज देऊन बूम केले. यामुळे आरोपी पुष्करला राग येऊन शिवमला शिवीगाळ करून त्याला मारण्यासाठी धावला. त्यावेळी दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. त्याचवेळी लहान भावाचे भांडण पाहून मोठा भाऊ भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडला असता, आरोपी पुष्करने त्याला जबर मारहाण करून त्याच्या डाव्या बाजूच्या छातीत जोरदार कोपरखळी मारून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर गंभीर अवस्थेत शुभमला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

खळबळजनक बाब म्हणजे, लहान भाऊ शिवमच्या वाढदिवशीच मोठा भाऊ शुभमचा खून झाल्याने बदलापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी १६ सप्टेंबर रोजी सकाळी शिवम याच्या फिर्यादीवरून आरोपी पुष्करवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रमसिंह कदम करीत आहेत.