आठ महिन्यांत ७७ बालके पालकांच्या स्वाधीन
ठाणे : गेल्या अनेक वर्षांपासून बेपत्ता, घर सोडून गेलेल्या मुलांचा छडा लावून त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात पोलिसांच्या विविध शाखांना यश आले आहे. गेल्या आठ महिन्यांत ७७ बालकांना त्यांचे हक्काचे घर मिळाले आहे.
गेल्या चार-पाच वर्षांपासून बेपत्ता असलेल्या मुलांचा शोध ठाणे गुन्हे शाखेच्या मानवीय तस्करी विरोधी पथक, चाईल्ड प्रोटेक्शन युनिट व इतर सात पथकांच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. जानेवारी ते ऑगस्ट 2022 या गेल्या आठ महिन्यात तीन व त्याहून अधिक वर्ष शोध न लागलेल्या 77 अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात सुखरूप देण्याची कामगिरी ठाणे गुन्हे शाखेने बजावली आहे. अपहरणांच्या दाखल एकूण गुन्ह्यात 75 टक्के गुन्हे हे लहान मुलांच्या अपहरणाचे आहेत. पूर्ववैमनस्य, खंडणी, भिक मागण्यासाठी आदी कारणांमुळे लहान मुलांचे अपहरण करण्यात येत असल्याच्या घटना अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
पूर्ववैमनस्यातून अपहरण करण्याचे प्रमाण फार कमी असले तरी खंडणीसाठी व भिक मागण्यासाठी लहान मुलांचे अपहरण करण्यात येत असल्याच्या घटना पोलिस तपासात वेळोवेळी उघड झाल्या आहेत. लहान मुलांचे अपहरण करून त्यांना भिक मागण्याच्या कामाला लावणाऱ्या अनेक टोळ्या मुंबई ठाणे परिसरात कार्यरत असल्याचा देखील संशय पोलिसांना आहे. आतापर्यंत अपहरणाच्या गुन्ह्यातील अनेक गुन्हेगारांना व टोळ्यांना गजाआड केले आहे.
कर्नाटक येथून दोन बहिणी त्यांच्या गुजरातमधील बहिणीकडे जाण्यासाठी निघाल्या आणि कल्याण स्थानकात उतरल्या. पुढे कसे जावे याची माहिती नसल्याने दोघी बहिणी कल्याण स्थानकातच फिरत होत्या. कल्याण रेल्वे पोलिसांना दोघी बहिणी मिळून आल्यानंतर त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्यांना उल्हासनगर येथे बालसुधारगृहात दाखल केले. चाईल्ड प्रोटेक्शन युनिटच्या पथकातील महिला कर्मचाऱ्यांनी दोघा बहिणींना विश्वासात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्या वहिनीचा मोबाईल नंबर सांगितला. त्या मोबाईल नंबरवरून मुलींच्या भावाशी संपर्क साधला.
जालना येथील कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा १० वर्षांचा मुलगा घरात काहीएक न सांगता थेट ठाणे स्थानकावर पोहचला होता. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या मुलास उल्हासनगर येथील बाल सुधारगृहात दाखल केले. त्याच दरम्यान ठाणे चाईल्ड प्रोटेक्शन युनिटच्या पथकाने या मुलाची माहिती मिळाली. त्यांनी संस्थेत जाऊन या मुलाची भेट घेऊन त्याच्या पालकांबाबत माहिती विचारली असता तो काहीएक माहिती देत नव्हता. या मुलाची दोन तीन वेळा भेट घेऊन त्यास प्रेमाने विचारपूस केल्यानंतर अखेर या मुलाने आपण जालना येथे राहत असल्याचे सांगितले. माहिती मिळताच जालना पोलीस ठाण्याचे हवालदार जायभाय हे सदर मुलाच्या आईवडीलांसह ठाण्यात दाखल झाले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ठाणे पोलिसांनी या मुलास त्याच्या पालकांच्या हवाली केले.
समतोल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा आमदार संजय केळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशा बेपत्ता आणि घर सोडून पळून जाणाऱ्या बालकांवर संस्कार करून त्यांचे योग्य पुनर्वसन करण्याचे काम समतोल फाऊंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून करत असल्याचे सांगितले. आतापर्यंत शेकडो मुलांना त्यांचे हक्काचे घर मिळवून देण्यात यश आल्याची माहिती संस्थापक विजय जाधव यांनी दिली.