पाच महिन्यांत २७ कोटींची वसुली
ठाणे : पाणीपट्टी वसुलीबाबत ठाणे महापालिकेने कडक धोरण आखले असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाणी पट्टी वसुली वाढली असल्याची माहिती समोर आली आहे. यंदा पाच सप्टेंबरपर्यंत २६ कोटी ७८ लाख ४९ हजारांची वसुली झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही वसुली तीन कोटी ३८ लाखांनी जास्त आहे.
करोना काळात महापालिकेच्या उत्पन्न वसुलीवर मोठा परिणाम झाला होता. पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने यंदाच्या एप्रिल महिन्यांपासूनच मोठ्या थकबाकीदारांकडे लक्ष केंद्रीत करत त्यांच्याकडून थकीत रक्कम वसुलीवर अधिक भर दिला आहे. पालिकेच्या पथकांनी यंदाच्या १ एप्रिल ते 5 सप्टेंबर या कालावधीत २६ कोटी ७८ लाख ४९ हजारांची वसुली केली आहे. त्यात थकीत रक्कम आणि नियमित देयकांचाही समावेश आहे. गेल्यावर्षी याच काळात २३ कोटी ३९ लाख
रुपयांची वसुली झाली होती. थकबाकीची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या थकबाकीदारांची नळ जोडणी खंडीत करण्याची कारवाई देखील पालिकेच्या माध्यमातून सुरु झाली आहे.
शहरात एकूण २ लाख २३ हजार नळ जोडणीधारक असून त्यामध्ये घरगुती आणि व्यावसायिक नळजोडणीधारकांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात एक लाख १३,३२८ नळजोडण्यांवर जलमापके बसविण्याचा निर्णय घेऊन आतापर्यंत ७०,८३५ मीटर बसविले आहेत. या स्मार्ट मीटरला देखील आता ठाणेकर पसंती देत असल्याचे दिसून आले आहे. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सहा कोटी ७७ लाख ८०८२ रुपयांची वसुली झाली आहे.
थकबाकीची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणा:या थकबाकीदारांची नळ जोडणी खंडीत करण्यात येत आहे, तसेच स्मार्ट मीटरच्या माध्यमातून बिले देण्यात आले असून त्यांची वसुली देखील योग्य पध्दतीने सुरु असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.