भाजपचा मेगाप्लान ठरला
मुंबई : मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक दरवर्षीपेक्षा वेगळी आणि निर्णायक ठरणार आहे. अशातच नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणुका होणार असल्याची माहिती शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. दरम्यान ‘अभी नही तो कभी नही’ या आवेशात भाजपने मुंबई महानगरपालिका निवडणुकीत डावपेच आखण्यास सुरुवात केली असून मेगाप्लानही ठरला आहे. तर शिंदे गट, मनसे आणि भाजपच्या मतांना एकमेकांमुळे नुकसान होऊ नये, म्हणून भाजप।स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे कळते.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदे आणि मनसे यांची युती होणार आहे. तर भाजप स्वबळावर लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपमुळं शिंदे गटाची मत फुटू नयेत आणि मनसेमुळे भाजपची उत्तर भारतीय मतं फुटू नयेत, म्हणून हा युतीचा प्लॅन बनवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदे आणि मनसे यांची युती होणार आहे. तर भाजप स्वबळावर लढणार आहे.
मुंबई महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने प्रमुख पक्ष आता मोर्चे बांधणीच्या कामाला लागले आहेत. दरम्यान, मुंबई महापालिकेतील 150 जागांवर शिवसेनेचे नगरसेवक असणार असा निर्धार किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला होता. तर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी देखील 150 चे टार्गेट येथील पदाधिकारी आणि आमदारांना दिले आहे. एवढेच नाही, तर पुढचा महापौर हा भाजपचाच असावा अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या आहेत.
शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटाने आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. या गटात मुंबईतील आमदारांचाही समावेश आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूकांमध्ये शिंदे गट आणि भाजप एकत्र लढून शिवसेनेला एकाकी पाडण्याचा प्रयत्न तर होणारच पण 150 जागांवर दावा केला जात असल्याने शिवसेनेच्या अडचणी वाढवण्याचा भाजपाचा प्रयत्न राहणार आहे.
काय आहे ८०-३०-४० चा फॉर्म्युला?
भाजपचे मुंबई महानगरपालिकेच्या १५० जागांची ८०-३०-४० अशाप्रकारे विभागणी केली आहे. यापूर्वी २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ८२ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे या जागा पुन्हा जिंकण्याचे भाजपचे प्रमुख लक्ष्य आहे. त्यासाठी २०१७ मध्ये विजयी झालेल्या भाजप नगरसेवकांना संधी दिली जाईल. तर २०१७ मध्ये भाजपचे उमेदवार ३० जागांवर दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. या जागा यंदाच्या निवडणुकीत जिंकण्याचा चंग भाजपने बांधला आहे. तर मुंबईतील ४० जागा अशा आहेत की, ज्याठिकाणचे उमेदवार स्वबळावर निवडून येतात. त्यामुळे या ४० जागांवरील ताकदवान उमेदवार गळाला लावण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जातील. जेणेकरून हे उमेदवार जिंकल्यास भाजपचे महानगरपालिकेतील संख्याबळ वाढेल. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये इतर पक्षांमधून इनकमिंग होण्याची शक्यता आहे.