उत्सव ७५ ठाणे महोत्सवाच्या उदघाट्नालाच रसिकांची पाठ

ठाणे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ठाणे महापालिकेने पुरस्कृत केलेला आणि तब्बल ६० संस्थांचा सहभाग असलेल्या उत्सव ७५ ठाणे महोत्सवाच्या उदघाटनालाच रसिकांनी पाठ फिरवली.

शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता ठाणे महापालिकेच्या गडकरी रंग्यातन नाट्यगृहात झालेल्या या उदघाट्नच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात खुर्च्या या रिकाम्याच होत्या. त्यामुळे यापुढे चार दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या नियोजनाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठाणे शहरात ठाणे महानगरपालिका व शहरातील ६० सामाजिक संस्थांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या उत्सव 75 ठाणे या महोत्सवाचे शानदार उद्घाटन शुक्रवारी गडकरी रंगायतनमध्ये झाले. या कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष माजी महापौर नरेश म्हस्के, पालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर,सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप मावळी असे मान्यवर उपस्थित होते. संध्याकाळी ६ वाजता हा उदघाट्नचा कार्यक्रम संपन्न होणार होता. मात्र नाट्यहागृहात रसिकांची गर्दीच होत नसल्याने कार्यक्रम सुरु करण्यासाठी देखील आयोजकांनी बराच विलंब लावला. उदघाट्नच्या कार्यक्रमासाठी जे लोक वेळेवर उपस्थित झाले होते त्यांनी मात्र या सर्व प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. बराच वेळ वाट पाहून रसिकांची गर्दी होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मात्र यावेळी नाट्यगृहात मोठ्या प्रमाणात खुर्च्या या रिकाम्याच होत्या.

सुमारे तीन महिन्यांपासून उत्सव ७५ ठाणे महोत्सवाचे नियोजन करण्याचे काम सुरु आहे. या कार्यक्रमाला महापालिकेचे देखील आर्थिक सहकार्य लाभले असून स्वतः ठाणे महापालिकेने हा कार्यक्रम पुरस्कृत केला आहे. मात्र एवढ्या आधी नियोजन करूनही रसिकांनी पहिल्याच दिवशी तेही उदघाट्नच्या कार्यक्रमाला पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.