बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन हे नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. ते सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर विविध फोटो, व्हिडीओ आणि ब्लॉग्स शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. नुकतंच त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. अमिताभ बच्चन यांनी ‘ऊंचाई’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे.
ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा ‘फ्रेंडशिप डे’ अर्थात मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा हा स्पेशल दिवस ७ ऑगस्ट रोजी साजरा केला जात आहे. या निमित्ताने बिग बींनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांचा आगामी ‘ऊंचाई’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. यात अनुपम खेर, बोमन इराणी, नीना गुप्ता आणि परिणीती चोप्रा प्रमुख भूमिकेत दिसत आहेत.
या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये ३ लोक बर्फाच्छित डोंगरावर चढताना दिसत आहे. हे तिघेजण कोण आहेत याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र यात अमिताभ बच्चन, बोमन इराणी आणि अनुपम खेर हे तिघेजण असल्याचे बोललं जात आहे. हे पोस्टर शेअर करताना अमिताभ बच्चन म्हणाले, “यंदाचा फ्रेंडशिप डे आगामी राजश्री प्रॉडक्शनचा ‘ऊंचाई’ या चित्रपटाची पहिली झलक पाहून साजरा करा. यात माझ्यासोबत अनुपम खेर आणि बोमन इराणी हे या प्रवासात सहभागी झालेत.” सूरज बडजात्या दिग्दर्शित हा चित्रपट येत्या ११ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान अमिताभ बच्चन यांचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. यात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. त्यासोबत तेच रश्मिका मंदान्ना आणि नीना गुप्तासोबत ‘गुडबाय’ आणि दीपिका पदुकोणसोबत ‘द इंटर्न’च्या रिमेकमध्येही झळकणार आहे. यासोबतच लवकरच त्यांचा ‘ऊंचाई’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.