राष्ट्रकुलमध्ये भारताचे सुवर्णपंचक; दिवसभरात १४ पदकांची कमाई

बर्मिगहॅम : भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविवारी दर्जेदार कामगिरी करताना पाच सुवर्णपदकांसह एकूण १४ पदकांची कमाई केली. या कामगिरीमुळे भारताने पदकतालिकेत न्यूझीलंडला मागे टाकत चौथे स्थान मिळवले. भारताच्या खात्यात १७ सुवर्ण, १३ रौप्य आणि २० कांस्य अशी एकूण ५० पदके आहेत.

बॉिक्सगमध्ये अपेक्षेप्रमाणे अमित पंघाल (५१ किलो) आणि विश्वविजेती निकहत झरीन (५० किलो) यांच्यासह पदार्पणात नितू घंगासने (४८ किलो) सोनेरी यश संपादन केले. या तिघांनीही आपापल्या लढती ५-० अशा फरकाने जिंकल्या.

अ‍ॅथलेटिक्समधील तिहेरी उडी क्रीडा प्रकारात एल्डहोस पॉल आणि अब्दुल्ला अबुबाकेर यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदकावर मोहोर उमटवली. तसेच १० मीटर चालण्याच्या शर्यतीत संदीप कुमार, तर भालाफेकीत अन्नू राणीने कांस्यपदके पटकावली. भारताच्या महिला हॉकी संघाने कांस्यपदकाच्या लढतीत न्यूझीलंडला पेनल्टी शूटआऊटमध्ये २-१ अशा फरकाने पराभूत केले. तसेच टेबल टेनिसमध्ये अचंता शरथ कमल आणि जी. साथियन जोडीने रौप्यपदक मिळवले.

स्क्वॉशमध्ये मिश्र दुहेरीतील कांस्यपदकाच्या लढतीत भारताच्या दीपिका पल्लिकल आणि सौरव घोषालाने ऑस्ट्रेलियाच्या डोना लोब्बन आणि कॅमेरून पिल्ले जोडीला ११-८, ११-४ असे नमवले.

तत्पूर्वी, पॅरा-टेबल टेनिस स्पर्धेत भाविना पटेलने सुवर्ण, तर सोनलबेन पटेलने कांस्यपदक पटकावले. तसेच कुस्तीमध्ये पूजा सिहाग (७६ किलो) आणि दीपक नेहरा (९७ किलो) यांनी कांस्यपदके जिंकली.