डॉक्टरांनी संवाद-मात्रा वाढवली तरच रुग्णांचे मनोबल वाढेल – मिलिंद बल्लाळ

ठाणे : प्रतिकारशक्तीचे महत्त्व किती असते हे कोरोनामुळे अधोरेखित झाले आहेच, पण त्याचबरोबर फॅमिली डॉक्टर या संकल्पनेला इंडियन मेडिकल असोसिएशनने चालना द्यावी, असे मत ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ यांनी व्यक्त केले.

4 ऑगस्ट 2022 रोजी सहयोग मंदिर, घंटाळी, ठाणे येथे इंडियन मेडिकल असोसिएशन ठाणे शाखेच्या वूमन डॉक्टर विंग या शाखेचा पहिला दिमाखदार सोहळा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मिलिंद बल्लाळ डॉक्टरांशी संवाद साधताना बोलत होते. डॉक्टरांवर होणारे हल्ले निषेधार्ह असतात. त्यांचे समर्थन कोणत्याही परिस्थितीत करता कामा नये, असे सांगून श्री. बल्लाळ यांनी डॉक्टर-रुग्ण संवाद व्यापक होण्याची गरज असल्याचे सांगितले. वैद्यकीय व्यवसायात पारदर्शकता येत असताना रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे ते म्हणाले. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची कारणमीमांसा करण्यासाठी आयएमएसने पुढाकार घ्यावा, असे श्री.बल्लाळ यांनी सुचविले. कार्यक्रमाची सुरुवात गणेशस्तवनाने झाली. डॉ. संगीता परदेशी यांनी सुरेल स्वरात गणेशस्तवन सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.वंदना जोशी यांनी खुमासदार शैलीत केले.

कार्यक्रमाला माजी अध्यक्ष डॉ. तांबे, रामचंदानी, डॉ.संतोष कदम, डॉ. सुनील बुधलानी, तसेच मावळत्या चेअरमन अध्यक्षा डॉ. राजश्री कारखानीस, डॉ. मीनल गाडगीळ उपस्थित होत्या. नवनिर्वाचित आयएमए प्रेसिडेंट डॉ. महेश जोशी व डब्ल्यूडब्ल्यूच्या चेअरमन अलका गोडबोले यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडला. याप्रसंगी सर्व सूत्रे अलका गोडबोले यांच्याकडे डॉ. कारखानीस यांनी सोपवली. डॉ. अलका गोडबोले यांनी आपल्या भाषणात त्यांच्या आगामी वर्षातील कामांचा थोडक्यात गोषवारा सांगितला. नवीन कार्यकारी मंडळाचा सत्कारही करण्यात आला.