कचराळी तलावाने ‘नाव राखले’

मोकळा श्वास घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचा कोंडला श्वास

ठाणे/सुरेश सोंडकर : ठाण्यातील उरले-सुरले तलाव नागरिकांना आरोग्य, मनोरंजनाचे साधन ठरले आहे, महापालिका मुख्यालयासमोरील कचराळी तलाव आणि उद्यानात मात्र पहाटे आणि संध्याकाळी येणाऱ्या लहान-थोर नागरिकांचा श्वास अनेक समस्यांनी कोंडला जात आहे. अनियमित साफसफाई, मरून पडलेली मांजरं आणि प्रवेशद्वारावरची फेरीवाल्यांची दादागिरी यामुळे महापालिकेचा या तलावावर झालेला लाखोंचा खर्च पाण्यात गेल्याची तक्रार येथे आलेले ज्येष्ठ नागरिक करीत आहेत.

शहरातील तलावांचे सुशोभीकरण करून ठाणेकरांना दिलासा मिळाला असला तरी प्रत्यक्षात या तलावांची देखभाल होत नसल्याने सुशोभीकरणावर झालेला कोट्यवधींचा खर्च वाया गेल्याचे उघडकीस आले आहे. ठाणे महापालिका मुख्यालयासमोरील कचराळी तलाव आणि त्यातील उद्यान हे याचे उत्तम उदाहरण ठरू शकेल.
सकाळी येथे मॉर्निंग वॉकसाठी अनेक नागरिक येतात. पहाटे वाहतूक सुरू नसल्याने ते त्यांची वाहने प्रवेशद्वारासमोर रस्त्याच्या कडेला उभी करतात, मात्र रस्त्यावर बेकायदेशीरपणे व्यवसाय करणारे भाजीविक्रेते त्यांना वाहने उभी करण्यापासून रोखतात. यावरून अनेकदा ज्येष्ठ नागरिकांशी त्यांचा तंटा-बखेडा होतो. बेकायदेशीरपणे येथे व्यवसाय करताना उलट नागरिकांनाच दमदाटी करणाऱ्या या फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी ज्येष्ठ नागरीक करत आहेत.

तलावाभोवती फेऱ्या मारताना मोकळा श्वास घेता यावा आणि आरोग्य संवर्धन व्हावे ही अपेक्षा नागरिकांची असते, पण येथील अनियमित साफसफाई नागरिकांची साफ निराशा करतात. येथील निर्माल्य कलश नेहमी उघडा असल्याने कचरा इतस्ततः विखुरलेला असतो, त्यामुळे दुर्गंधीने नागरिकांना मॉर्निंग वॉकचा आनंद घेता येत नाही.
या उद्यानात मांजरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून दोन दिवसांपूर्वी येथे मंदिराजवळच मांजरीची सहा पिल्ले मरून पडली होती. त्याच्या दुर्गंधीने नागरिकांना काढता पाय घ्यावा लागला. या आणि अशा अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त असून या तलावाच्या सुशोभिकरणावर झालेला लाखो रुपयांचा खर्च देखभालीअभावी पाण्यात गेल्याची तक्रार नागरिक करत आहेत.