स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सतराशे विघ्ने

* ठामपा निवडणूक पुढच्या वर्षी?
* इच्छुक उमेदवारांची पंचाईत

ठाणे : ठाणे महापालिकेसह राज्यातील १८ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने रद्द केल्या असून जोपर्यंत निवडणूक आयोग कोणताही आदेश देत नाही तोपर्यंत निवडणुकीबाबत कोणत्याही प्रकारची प्रक्रिया करण्यात येणार नाही. परिणामी या निवडणुका पुढील वर्षी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर होणार असल्याची शक्यता गृहीत धरून ठाणे महापालिका प्रशासनाने तीन सदस्य पद्धतीने प्रभाग रचनेचा आराखडा तयार केला होता. त्यावर हरकती सूचना मागवून त्याची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू केली होती. निवडणुकीकरिता अनुसूचित जाती-जमाती आणि महिलांच्या आरक्षण सोडती देखील काढण्यात आल्या होत्या. त्यावर एकही हरकत आली नाही, त्यामुळे अंतिम आरक्षणाला मंजुरी देण्यात आल्याचा आदेश प्रसिद्ध करण्यासाठी देखील देण्यात आला होता, परंतु महाविकास आघाडी सरकारने घेतलेला तीन सदस्य पॅनेल पद्धतीचा निर्णय रद्द करून विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारने २०१७च्या प्रमाणे निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला.

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे निवडणूक घेण्याचे सर्व सोपस्कार नव्याने करावे लागणार आहेत, जो वेळखाऊ आहे. जोपर्यंत कोणत्याही प्रकारचा आदेश निवडणूक आयोग देत नाही तोपर्यंत निवडणूकीची प्रक्रिया सुरू करता येणार नाही, त्यामुळे महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी होण्याची शक्यता एका वरीष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. परिणामी निवडणुकीसाठी देव पाण्यात घालून बसलेल्या इच्छुक उमेदवारांची पंचाईत झाली आहे.