वाहतूक कोंडीत पर्याय ठरणारे सेवा रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याची मागणी

ठाणे : मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्यास सेवा रस्ते पर्याय म्हणून वापरले जातात, मात्र सेवा रस्त्यांचीच अवस्था बिकट असून या रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करण्याची मागणी होऊ लागली आहे.

ठाणे महापालिका हद्दीत रस्त्यांचे जाळे मोठे आहे. त्यातील काही रस्ते हे डांबरी तर काही रस्ते कॉंक्रीटचे करण्यात आलेले आहेत. तर या रस्त्यांना जोड रस्ते म्हणून किंवा लहान वाहनांना रस्त्यांचा पर्याय मिळावा या उद्देशाने आनंद नगर ते गायमुख अशा प्रकारे सेवा रस्ता तयार करण्यात आला. त्यानुसार आनंद नगर ते माजिवडा हा पाच किमीचा रस्ता आहे. तर पुढे कापुरबावडी ते गायमुख हा ११ किमीचा रस्ता आहे. त्यानुसार दोन्ही बाजूचा हा रस्ता मिळून ३२ किमीचा रस्ता हा सेवा रस्ता आहे. परंतु सध्या यातील काही किमीचाच रस्ता चांगला असल्याचे दिसत आहे. त्यातील आनंद नगर ते माजिवडा या चांगल्या स्वरुपातील रस्ता असल्याचे दिसत आहे. याठिकाणी कोणत्याही स्वरुपाचे खोदकाम वांरवार होतांना दिसत नाही. परंतु कापुरबावडी ते गायमुख या भागातील सेवा रस्त्यांची अवस्था तशी फारशी चांगली नाही. ब्रम्हाड नाक्यापासून पुढे उजव्या बाजूकडील सेवा रस्त्याची अवस्था वारंवार खोदकाम करण्यात येत असल्याने बिकट झाली आहे. तर दुस:या बाजूला मेट्रोचे काम सुरु असल्याने हा रस्ता देखील सध्या वापरात नाही.

दुसरीकडे दर पवासळ्यात या रस्त्यांची चाळण झाल्याचेच दिसत आहे. त्यामुळे घोडबंदरच्या मुख्य रस्त्यांवर वाहतुक कोंडी झाल्यास छोटय़ा वाहन चालकांना देखील या सेवा रस्त्यांचा वापर करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळेच हे रस्ते चांगल्या स्थितीत राहावे या उद्देशाने आता कॉंक्रीटीकरणाचा पर्याय पुढे आला आहे. रस्ते कॉंक्रीटचे केल्यास त्यांचा दर्जा चांगला राहून वारंवार खड्डे पडण्याचे प्रमाणही यामुळे बंद होणार आहे. त्यानुसार पालिका देखील त्याचा विचार करीत असल्याचे दिसत आहे. पातलीपाडा येथील उजव्या बाजूकडील एका पॅचवर पालिकेने कॉंक्रीटकरणाचा प्रयोग देखील केला आहे. तो यशस्वी झाल्यास इतर ठिकाणी देखील हा पर्याय उपयोग आणण्याचा विचार केला जात आहे.