ठाण्यात स्वाईन फ्लुने आणखी एकाचा मृत्यू

जिल्ह्यात २१० रुग्णांची नोंद

ठाणे : मागील काही दिवसात स्वाईनच्या रुग्णात वाढ होत असतांना ठाण्यात आणखी एका मृत्युची नोंद झाली आहे. त्यानुसार ठाण्यातील एकूण मृत्यु चार झाले असून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पाच मृत्यु झाले आहेत.

आठवड्याभरापूर्वी जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यू बाधित रुग्णांची संख्या ३४ होती तर तीन जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काल गुरुवारी ठाणे महानगर पालिका हद्दीत स्वाईन फ्लुने एका रुग्णांचा बळी गेल्याने पालिका हद्दीतील मृतांची संख्या चार इतकी झाली. जिल्ह्यातील मृतांचा आकडा पाचवर गेला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

ठाणे महानगरपालिका हद्दीत गुरुवारी एकाच दिवशी सर्वाधिक ५१ रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे रुग्णांची संख्या १४१ वर गेली. तर, मृत्युच्या संख्येत एकने वाढ झाली असून मृतांची संख्या चारवर गेली आहे. शहरात शुक्रवारी नोंद करण्यात आलेल्या व्यक्तीचे वय ६१ होते. सहव्याधी असलेला हा रुग्ण होता. ताप आणि श्वसनास त्रास होत असल्यामुळे २५ जुलैला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याची चाचणी करण्यात आली तेव्हा तो स्वाईन फ्लू बाधित असल्याचे निष्पन झाले. परंतु, २६ जुलैला त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोग्य विभागाकडे या रुग्णाच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत आठ रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या ३५ वर पोहोचली आहे. त्यातच जिल्ह्यात सध्या ११० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, उर्वरित ९५ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.