* काम पुढील महिन्यात सुरू होणार
* भाईंदर- मुंबई आणखी जवळ येणार
भाईंदर : दहिसर पश्चिम ते मीरा भाईंदर पश्चिमला जोडणाऱ्या प्रस्तावित जोड रस्त्याचे (लिंक रोड) काम मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागातर्फे करण्याचे नियोजिले आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याने या जोडरस्त्याचे काम मंजूर झाले असून या रस्त्याच्या कामासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा मागविण्यात आल्या आहेत. ही निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
निविदा प्रक्रिया पूर्ण करतानाच विविध आवश्यक परवानग्या तसेच रस्त्याच्या कामासाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या लिंक रस्त्याचे काम प्रत्यक्षपणे चालू करण्यात येईल असे मुंबई महापालिकेने आमदार सरनाईक यांना पत्राद्वारे कळवले आहे. पुढील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती आमदार सरनाईक यांनी आज दिली.
दहिसर ते भाईंदर लिंक रस्ता तयार व्हावा यासाठी आमदार प्रताप सरनाईक गेले काही वर्षे प्रयत्न व पाठपुरावा करीत आहेत. गेल्यावर्षी अखेरीस डिसेंबर महिन्यात याबाबत मुंबई महापालिकेत आमदार सरनाईक व अन्य वरिष्ठ अधिकारी यांची बैठक होऊन हा रस्ता मुंबई महापालिका विकसित करेल असा निर्णय घेण्यात आला होता. या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे यासाठी आमदार सरनाईक मुंबई मनपा अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. जुलै २०२२ मध्ये पुन्हा एकदा मुंबई मनपा आयुक्तांना पत्र देऊन रस्त्याच्या कामाला लवकर सुरुवात करावी अशी विनंती आमदार सरनाईक यांनी केली असता त्यांना मुंबई मनपाच्या पूल विभागाकडून लेखी उत्तर देण्यात आले आहे. त्यात निविदा प्रक्रिया व आवश्यक पूर्वतयारी पूर्ण करून रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल असे कळविण्यात आले आहे.
दहिसर-भाईंदर लिंक रस्ता हा सहा किलोमीटर लांबीचा असून या रस्त्याच्या कामासाठी जवळपास १७०० कोटींचा खर्च होणार आहे. सहा किमी रस्त्यापैकी दोन किमी मुंबई मनपा हद्दीत तर चार किमी मीरा भाईंदरच्या हद्दीत आहे. हा रस्ता ६० मीटर रुंद (२०० फूट) असणार असल्याने वाहनचालक आपल्या वेगाने जाऊ शकणार आहेत.
दहिसर-भाईंदर लिंक रस्त्याच्या या कामाला निविदा प्रक्रिया पूर्ण करून पुढील महिन्यात प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येईल. या रस्त्याला लागणारी जागा प्रत्यक्षात भूसंपादन करून देण्याची जबाबदारी मीरा-भाईंदर महापालकेची असणार आहे. भूसंपादन व आवश्यक परवानग्या मिळवून रस्त्याचे काम लवकर सुरू व्हावे यासाठी मी प्रयत्नशील आहे , असे आमदार सरनाईक यांनी सांगितले.
टोल फ्री जोड रस्ता !
गेले ४-५ वर्षे दहिसर टोलनाका येथे वाहतूक कोंडी होते शिवाय टोल ही वाहन चालकाना भरावा लागतो. त्यामुळे मीरा भाईंदर ला पर्यायी रस्त्याची गरज होती. दहिसर ते भाईंदर लिंक रस्त्याने शहराची मोठी गरज पूर्ण होणार असून हा रस्ता टोल फ्री रस्ता असणार आहे. रुंद रस्ता तयार होणार असल्याने ट्रॅफिक जाम पासून मुक्ती मिळेल. या रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर किमान पुढील २ वर्षाच्या आत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य असेल , अशी माहितीही आमदार सरनाईक यांनी दिली. या लिंक रस्त्यामुळे मुंबई आणि मीरा भाईंदर अधिक जवळ येणार आहे. मीरा भाईंदर हा मुंबईचाच एक भाग बनेल. मीरा भाईंदर महापालिकेने जागेच्या भूसंपादनासाठी वेगाने प्रयत्न करावेत, अशा सूचना आमदारांनी केल्या आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जोड रस्त्याच्या कामात पूर्ण सहकार्य केले आहे. मुख्यमंत्री झाल्यावर मी त्यांच्याकडे पाठपुरावा केल्याने या रस्त्याच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाला वेग द्या आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा अशा सूचना त्यांनी मुंबई महापालिकेला केल्या. त्यामुळे पुढील महिन्यात मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांच्या हस्तेच रस्त्याच्या कामाचा श्री गणेशा होईल. या रस्त्यासाठी जी जमीन संपादित करावी लागणार आहे त्यात काही जमीन मिठागर विभागाची सुद्धा आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या काही परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. केंद्रातही आपलेच सरकार आहे व राज्यातही शिवसेना भाजप युतीचे सरकार असल्याने केंद्राकडून आवश्यक त्या परवानग्या मिळतील , असेही आमदार सरनाईक म्हणाले.
तब्बल १७०० कोटी रुपयांचा खर्च करून मुंबई महापालिका हा रस्ता तयार करणार आहे. मीरा भाईंदर पालिकेचा एक रुपयाही यात खर्च होणार नाही. त्यामुळे मीरा भाईंदरकर नागरिकांचा कोणताही पैसा यात खर्च होणार नाही. मात्र दर्जेदार रस्ता नागरिकाना मिळणार आहे.