ठाणे : सार्वजनिक गणेशोत्सवात विविध परवानग्या घेण्यासाठी मंडळांनी ऑनलाईन मार्ग अंगीकारला असून ठामपा हद्दीतून १८ पैकी १३ अर्ज हे ऑनलाईन आले आहेत. यामुळे नेहमीची पायपीट थांबली आहे.
आगामी सार्वजनिक गणेशोत्सवासाठी ठाणे महापालिकेने ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पध्दतीने अर्ज स्विकारण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार मागील काही दिवसात महापालिकेकडे १८ अर्ज आलेले आहेत. मंडपासाठी अर्ज केल्यानंतर प्रभाग समितीमधील कार्यकारी अभिंयत्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन मंडपाच्या आकाराची पाहणी केली जाते. त्यानंतर अर्ज पुढील प्रक्रियेसाठी जात असतो. त्यानंतर तीन विभागांचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागत आहे. यामध्ये स्थानिक पोलीस, वाहतुक पोलीस आणि अग्निशमन विभाग या विभागांनी ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर अर्ज अंतिम स्वरुपात निकाली काढला जातो. ऑफलाईन प्रक्रियेत प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन या सर्व प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. ऑनलाईन पद्धतीमध्ये ही सर्व प्रक्रिया एका जागेवर बसून करता येत असल्याने मंडळांनी यंदा ऑनलाईन पद्धतीला आपली पसंती दर्शवली आहे. त्यानुसार महापालिकेला १८ पैकी १३ अर्ज ऑनलाईन स्वरुपात प्राप्त झाले असून अवघे पाच अर्ज ऑफलाईन पध्दतीत देण्यात आले आहेत.
प्रभाग समिती प्राप्त अर्ज
नौपाडा ०३
वागळे ०१
लोकमान्य सावरकरनगर ०१
वर्तकनगर ०१
माजिवडा मानपाडा ०४
उथळसर ०३
कळवा ०२
मुंब्रा ०३
दिवा ०१