भाईंदर महापालिकेच्या तिजोरीत १४१ कोटी कर जमा

यंदाची मालमत्ता करवसुली दुप्पट वेगाने

भाईंदर : कर सवलत आणि प्रशासनाचा पाठपुरावा यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा मालमत्ता करवसुलीचा वेग दुप्पट असून आतापर्यंत १४१ कोटींचा कर वसूल करण्यात आला आहे.

मालमत्ता कर वसुलीचा वेग वाढावा यासाठी मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभाग आढावा बैठकीनुसार शहरातील मालमत्ता कराचा सतत पाठपुरावा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसेच वेळेत कर भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकाना विशेष सवलत देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. महानगरपालिका मालमत्ता कर देयकाचे ऑनलाईन पद्धतीने वितरण झालेले आहे. मालमत्ता कर धारकांची सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाची देयके मे महिन्यात ऑनलाईन जनरेट झाले असून संगणक आज्ञावलीद्वारे मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेचे mbmc.gov.in/property व MyMBMC अँपद्वारे ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सेवा उपलब्ध करण्यात आलेली आहे.

महापालिका महासभेच्या मंजुरीने मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी ३१ जुलै २०२२ पर्यंत आपल्या मालमत्ता कराचा संपूर्ण भरणा केल्यास त्यांना ५% सूट मिळणार असल्याचे मीरा-भाईंदर महानगरपालिका कर विभागामार्फत जाहीर करण्यात आले होते. नागरिकांनी सदर संधीचा लाभ घेतल्याने इतिहासात प्रथमच दिनांक ३१ जुलै २०२२ रोजी मध्यरात्रीपर्यंत मिरा भाईदर महानगरपालिका कोषाग्रहामध्ये एकूण मालमत्ता कर ७७ कोटी ९४ लाख ९६ हजार ४२० इतका जमा करण्यात आलेला आहे. महापालिका इतिहासात प्रथमच विक्रमी मालमत्ता कर वसुली झाल्याने आयुक्त  दिलीप ढोले यांच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, उपायुक्त (कर विभाग) संजय शिंदे, सहाय्यक आयुक्त (कर विभाग) सुदाम गोडसे, सर्व कर निरीक्षक, कर वसुली लिपिक व कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात येत असून आयुक्तांनी शहरवासीयांचे आभार मानले आहेत.