नागरी वस्तीत आलेल्या माकडाची वनविभागाकडून सुखरूप सुटका

अंबरनाथ : नागरी वस्तीमध्ये वाट चुकलेल्या एका माकडाची प्राणीमित्र आणि वनविभागाच्या सहाय्याने सुखरूप सुटका करण्यात आली.

अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका  परिसरात हनुमान मंदिरामागील एका घरात माकड आल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली. याबाबत वनविभागाचे कर्मचारी दिनेश मल्होत्रा यांना माहिती देण्यात आली.  बदलापूरचे वनक्षेत्रपाल विवेक नातू यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र पाटील , श्रावण शर्मा, अशोक खेडेकर, दिगंबर नेवरेकर आणि वन्यजीव रक्षक यांना  पाचारण करण्यात आले. ज्या घरात माकड घुसले होते, ते घर बंद करून घरातील सगळ्यांनी बाहेर येण्याच्या सूचना श्री. मल्होत्रा यांनी दिल्या.

सुमारे तीन तासांच्या प्रयत्नानंतर माकडाला पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याचे श्री. मल्होत्रा यांनी सांगितले.