गतवर्षी पेक्षा यंदा २९ टक्क्यांपेक्षा जास्त मालमत्ता करवसुली
ठाणे : गेल्या आठवड्यात शनिवारी एका दिवसांत तब्बल १५ कोटींची मालमत्ता कर वसुली झाली आहे. मागील वर्षी ३१ मार्च २०२१ रोजी अशाच प्रकारे एका दिवसांत १८ कोटींची वसुली करण्यात झाली होती. त्यानंतर आता ही वसुली झाली आहे. आतापर्यंत पालिकेने ३४४ कोटींची वसुली केली असून गतवर्षीच्या तुलनेत ही वसुली २९ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याची माहिती मालमत्ता कर विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
मालमत्ता कर वसुली अधिक वेगाने आणि वेळेवर होण्यासाठी मालमत्ता विभागाचे उपायुक्त गजानन गोदापुरे यांनी वसुलीसाठी विशेष नियोजन केले आहे. यासाठी सुट्टीच्या दिवशीही सर्व कार्यालये खुली ठेवण्यात आली असून विशेष म्हणजे मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना कर भरणे कसे सोयीचे होईल यासाठी प्रतिसाद देणारी टीम तयार करण्यात आली असल्याने मालमत्ता कर भरणे नागरिकांना अधिक सोपे गेले. मुख्यालयापासून ते प्रभाग समिती कार्यालयांमध्ये अशा प्रकारच्या प्रतिसाद टीम नियुक्त करण्यात आल्या असल्याने नागरिकांनी देखील मालमत्ता कर भरण्यास चांगला प्रतिसाद दिला आहे. परिणामी गतवर्षीपेक्षा यावर्षी २९ टक्क्यांपेक्षा अधिक मालमत्ता कर वसुली झाली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी ७७० कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्यावर्षी हेच उद्दिष्ट ५९१ कोटी एवढे ठेवण्यात आले होते. या आर्थिक वर्षात आतापर्यंत ३४४ कोटींची वसुली झाली आहे. तर गतवर्षी या कालावधीत हीच वसुली २६६ कोटींची होती. यामध्ये चार टक्के कर सवलतीचा फायदाही नागरिकांकडून घेण्यात आला आहे. मात्र असे असले तरी,पालिकेने सुरु केलेल्या मदत कक्षामुळे वसुलीला अधिक बळ मिळाले आहे.
मालमत्ता कर भरणाऱ्यांनी ऑनलाईन कर भरण्याला देखील चांगला प्रतिसाद दिला आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून ठाणे महापालिकेच्या तिजोरीत १०६ कोटी रुपये जमा झाले आहेत. तर उर्वरित २३८ कोटी हे ऑफलाईन पद्धतीने जमा झाले आहेत. या आर्थिक वर्षात दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दररोज दोन कोटी वसूल करण्याचे टार्गेट मालमत्ता विभागाच्या वतीने ठेवण्यात आले आहे. या आर्थिक वर्षातील केवळ २४४ दिवस शिल्लक असून या दिवसांत उरलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यासाठी प्रभाग स्तरावरच प्रत्येकाला टार्गेट देण्यात येत आहे. मात्र असे असले तरी जेवढा कालावधी राहिला आहे त्याच्या तुलनेत वसुलीचा टक्का हा ४३ टक्के असल्याने हे उद्दिष्ट पार करायला अडचण नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
प्रभाग समितीनिहाय वसुली
प्रभाग समिती वसुली (कोटींमध्ये)
उथळसर २४.६४
नौपाडा-कोपरी ४७.८३
कळवा ११.४४
मुंब्रा ११.८९
दिवा १०.२०
वागळे १०.७०
लोकमान्य-सावरकर १२.०५
वर्तक नगर ५६.७७
माजिवडा -मानपाडा १३०.५५
मुख्यालय २७.२१
एकूण – ३४३.२७