शिवसेना जिल्हाप्रमुखपदी केदार दिघे यांची नियुक्ती

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड झाल्यानंतर मागील एक महिने रिक्त असलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदी अखेर केदार दिघे यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नियुक्ती केली.

खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिक आज उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी मातोश्री येथे गेले होते. त्यावेळी कै. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची ठाणे जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले तसेच माजी नगरसेविका शिवसेना महिला आघाडी प्रमुख अनिता बिर्जे यांची उपनेते पदी बढती करण्यात आली आहे तर शिवसेना शहर प्रमुख पदी प्रदीप शिंदे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. ठाणे विभागीय शिवसेना प्रवक्ते पदी माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष चिंतामणी कारखानीस यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

दरम्यान शिवसेनेला आहोटी लागली असताना काँग्रेसचे माजी नगरसेवक जयनाथ पूर्णेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी खासदार राजन विचारे म्हणाले की शिवसेना ही ठाण्याची आहे शिवसेनेचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यात जीवाचे रान करणार आहे. शिवसेनेच्या सोबत सर्वसामान्य शिवसैनिक अजूनही आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी आला आहे. हे शिवसैनिक पैसे देऊन आणले नाहीत तर ते स्वतःहून आले असल्याचे खा. श्री.विचारे म्हणाले.