खपलीखालची जखम

आधीच काय राज्यातील सार्वजनिक जीवन घडामोडींमुळे ढवळून निघाले असताना आणि त्याचे तरंग आणखी काही दिवस उमटत रहाण्याची चिन्हे असताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भूमिपुत्रांना दुखावणारे वादग्रस्त विधान केले आहे. त्यावर शिवसेनेने जोरदार आक्षेप नोंदवला असून मराठी माणसाच्या अस्मितेचा मुद्दा त्यानिमित्ताने अडगळीतून बाहेर पडणार आहे. अर्थात नेहमीप्रमाणे त्याची गत भस्मासुर थाळीतील तोंडी लावण्यासाठी वाढल्या जाणाऱ्या चटणीसारखी होऊ नये म्हणजे मिळवले !
राज्यपालांच्या विधानाचा राजकीय अन्वयार्थ कोणी कसा काढायचा हे विरोधी पक्षाचे नेते ठरवतील. परंतु शिवसेनेसाठी ही अतिशय उत्तम अशी चालून आलेली संधी आहे. त्यांनी राज्यपालांच्या घटनात्मक पदाचा गैरवापर केल्याचा आक्षेप प्रथमदर्शनी नोंदवला आहे. पण हा मुद्दा किती आक्रमकपणे पुढे रेटायचा याबाबत त्यांची भूमिका संदिग्ध आहे, असे वाटते. सर्वसामान्य मराठी माणूस शिवसेनेतील अलीकडेच झालेल्या वादामुळे भांबावून गेला आहे. त्यांना खरी शिवसेना नेमकी कोणती असा संशय येऊ नये यासाठी शिवसेनेला पूर्ण आक्रमकपणाने हा मुद्दा हाती घ्यावा लागेल. पुन्हा एकदा बाळासाहेब असते तर त्यांनी काय प्रतिक्रिया नोंदवली असती हा प्रश्न चर्चाविश्वात फेर धरू लागेल. उद्धव ठाकरे यांना मराठी माणसाची ही अपेक्षा लक्षात घेऊन भूमिकेची मांडणी करावी लागेल. आक्रमकपणाला नियोजनबद्ध कार्यक्रमाची जोड मिळावी. मराठी तरुण त्यांची वाट पहात आहे.
स्वातंत्र्यदिनाला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. तरीही अधूनमधून ‘ब्रिटिशांची राजवटच’ बरी होती अशा आशयाची प्रतिक्रिया कानी पडत असते. आमिर खानपासून वेगळ्या झालेल्या त्याच्या बायकोने (किरण राव) तर अशी भूमिका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना जाहीरपणे मांडली होती आणि त्यामुळे बराच गदारोळ उडाला होता. आजही अनेक मराठी माणसे जाहीरपणे परप्रांतीयांना नोकरीत ठेवणे पसंत करीत असल्याची कबुली देतात. यामध्ये अनेक शिवसेना नेत्यांचाही समावेश असतो. मराठी शाळांचा पुरस्कार करणारे आणि मराठी भाषेबद्दल उमाळा बाळगणारे आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालतात, दांभिकपणा दिसतो. कोठारी यांचे समर्थन करणार नाही पण त्यांच्या म्हणण्याचा मतितार्थ दुर्लक्षून चालणार नाही. त्यांचे विधान खरोखरीच गंभीरपणे घेतली जाईल का, अशी शंका येते. राज्यपालांच्या विधानाकडे म्हणूनच भावनात्मक पातळीवर बघण्याऐवजी त्यांना असे का बोलावे वाटले याचा आपण विचार करायला हवा. हा विषय मराठी पाट्यांचा आग्रह धरण्याइतका हलक्यात घेऊन सुटणारा नाही. त्यासाठी पाट्या लावणारी दुकाने मराठी माणसाची कधी होतील यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. गुजराती आणि राजस्थानी बांधवांची मानसिकता मराठी माणसांनी आणि नेत्यांनी किती अभ्यासली आणि आचरणात आणली हाही संशोधनाचा विषय आहे. या समाजाची एकी आणि अर्थकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन मराठी माणसांनी किती आत्मसात केला? त्यांची शिस्त आणि जिद्द बाळगण्याची किती जणांची तयारी आहे? त्यांना अर्थपुरवठा करण्यात आपल्या सहकारी बँका कमी पडत असतील तर त्या दृष्टीने आपण कोणती पावली उचलली? राज्यपालांच्या भूमिकेवर आगपाखड करण्याऐवजी ते आव्हान म्हणून स्वीकारण्याची गरज आहे. मराठी माणसाला गृहीत धरले जाते कारण त्यांनी स्वतःला सिद्ध करण्याचे प्रयत्न केले नाहीत. काही जणांनी केले, परंतु त्यांच्या पाठीशी आपली व्यवस्था उभी राहिली का? वर्षातून दोन-चार वेळा सणासुदीनिमित्त ग्राहकपेठा भरवून मराठी पाऊल पुढे पडणार नाही. अशा ग्राहकपेठा सामाजिक उपक्रम म्हणून छान वाटतात. परंतु त्यांना दुसऱ्या ‘लेव्हल’वर नेण्यासाठीचे अनुकूल पर्यावरण आम्ही तयार केले काय? श्री. कोशयारी यांनी चिमटा काढला आहे, परंतु भूमिपुत्र खडबडून जागा होणार आहे काय?
ताजेच उदाहरण घेऊया. कोरोनाचा उपद्रव सुरू होताच परप्रांतीय मुंबई सोडून गावी परतू लागले. महाराष्ट्र या बांधवांवर इतका अवलंबून आहे की इथला व्यवहार ठप्प होणार अशी शक्यता निर्माण झाली होती. अशावेळी मराठी माणसाने त्याकडे संधी म्हणून पहावे म्हणून काय प्रयत्न झाले? मास्क विकणारे बाहेरचे, औषधे विकणारे बाहेरचे, रुग्णालये चालवणारेही बहुसंख्य बाहेरचेच. अशा सर्व तथाकथित उपऱ्यांनी संधीचे सोने केले, तेव्हा मराठी माणसाला कोणी बांधून ठेवले होते काय? किती भूमिपुत्र योजना घेऊन सरकारकडे गेले होते आणि त्यांना काय प्रतिसाद मिळाला होता हेही या निमित्ताने तपासून घ्यायला हवे.
राज्यपालांचे म्हणणे अप्रस्तुत आहे. ते जिव्हारी लागणारे आहे, परंतु त्यावर टीका करून भूमिपुत्रांना न्याय मिळणार आहे काय? मराठी माणसाला आर्थिक उत्कर्षाच्या मार्गावर आणण्यासाठी एक नियोजनबद्ध कार्यक्रम घेणे ही काळाची गरज आहे. राज्यपालांनी शिवसेनेला छान मुद्दा दिला आहे, त्याचे सोने करणे हे त्यांच्या हाती आहे. हा विषय राजकारणापुरता सीमित न ठेवता त्याला अर्थकारणाचे आयाम देण्याची गरज आहे. शिवसेनेने मराठी माणसाच्या जखमेवर फुंकर जरूर घातली, प्रसंगी अस्मितेचे मलमही लावले. खपली धरल्यामुळे जखम भरली असे त्यांना वाटले. प्रत्यक्षात खपलीखाली जखम भळभळत आहे आणि ती थांबवण्यासाठी मराठी माणसाला उत्कर्षाचा मार्ग दाखवावा लागेल. शिवसेनेकडून हे काम झाले तर संघटनेचे बुरुज भक्कम राहतील. मुलुख मैदानात मराठी तोफ सज्ज करण्यात ‘हुषारी’ आहे.