ठाणे : ठाण्यातील बी केबीन परीसरातील राहणारे ६० वर्षिय वृद्ध अशोक जाधव यांचा स्वाइन फ्ल्यूमुळे मृत्यू झाला असून त्यांच्या मूत्यनंतरही महापालिका प्रशासनाने कुठल्याही प्रकारची खबरदारी न घेतल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
अशोक जाधव यांचा स्वाइन फ्ल्यूमुळे मृत्यू झाल्यानंतर त्यांचा पुतण्या शैलेश जाधव दोन दिवसांपासून ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात याच आजारावर उपचार घेत आहे. जाधव कुटुंबातील ९-१० जण हे ताप आला असल्याने घरातच उपचार घेत आहेत मात्र एक रुग्ण स्वाइन फ्ल्यूमुळे दगावल्यानंतरही महापालिका प्रशासनाने बी केबीन परिसरात कुठल्याही प्रकारची खबरदारी घेतली नाही आणि परिसरात सॅनिटायजेशन व कुटुंबीयांची तपासणीही न केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून लवकरात लवकर उपाय योजना करावी आणि स्वाइन फ्ल्यू या आजाराच्या चाचणीसाठी ४ ते ५ हजार खर्च येत असून मध्यमवर्गीय कुटुंबाना हा खर्च न परवडणारा असून ठाणे महापालिकेने मोफत स्वाइन फ्ल्यूची तपासणी करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. ठाणे जिल्ह्यात २० रुग्ण स्वाइन फ्ल्यूचे आढळल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्वाइन फ्ल्यू कसा पसरतो?
तर हा रोग हवेतून पसरतो, स्पर्शाने ही पसरतो, गर्दीच्या ठिकाणी पसरू शकतो. खोकल्याने पसरू शकतो. स्वाइन फ्ल्यू हा आजार ६० वर्षांवरील वयोवृद्ध नागरिकांना, गरोदर मातांना व ५ वर्षा खालील मुलांना लवकर होतो, स्वाइन फ्ल्यू ची लक्षणे ताप येणे, डोकं दुखणं, आग जड वाटणे, उलटी होणे अश्या प्रकारचे लक्षणे आहेत, जर कोणाला असे लक्षण आढळल्यास आपल्या जवळच्या रुग्णालयात जाऊन तपासणी करण्याचा सल्ला जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टरांनी दिला.
ह्या आजारांपासून स्वतः चा बचाव कसा करायचा?
विटामिन सी असणाऱ्या फळांचे सेवन करणे, गरम पाणी पिणे आणि जास्त पाणी पिणे, हाय प्रोटिन डाइट ठेवणे, पालेभाज्या खाणे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे, जेवणामध्ये लिंबूचे सेवन करणे, संत्री खाणे ह्या सर्व गोष्टी केल्यावर स्वाइन फ्ल्यूचा सामना आपण करु शकतो,अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली.