एस.टी प्रवाशांसाठी मोबाईल आरक्षण अ‍ॅप

ठाणे : राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी अँड्रॉईड मोबाईलकरीता ‘एमएसआरटीसी मोबाईल रिझर्व्हेशन अ‍ॅप’ उपलब्ध करुन  दिले आहे.

लांब व मध्यम लांब पल्ला तसेच लघु पल्ल्यांच्या मार्गांवरील ज्या फे-या आरक्षणासाठी उपलब्ध आहेत, अशा फे-यांचे प्रवाशांना याद्वारे आरक्षण करता येणार आहे. हे अ‍ॅप्लिकेशन अँड्रॉइड मोबाईल धारकांनी ‘गुगल प्ले स्टोअर’ वरून डाऊनलोड केल्यानंतर प्रथम सर्व स्वत:च्या माहितीची नोंदणी करून ‘लॉगिन’ करणे गरजेचे आहे. प्रवाशांना याद्वारे त्यांच्या सोयीचा आसन क्रमांक, फेरीची वेळ, बससेवेचा प्रकार आणि प्रवासाकरीता चढण्याचे व उतरण्याचे ठिकाण इत्यादी बाबी निवडता येतील.

तिकिटाच्या आगाऊ आरक्षणासाठी ‘नेट बँकिंग, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड’द्वारे ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे. अँड्रॉइड मोबाईलचा वापर करून एमएसआरटीसी मोबाईल रिझर्वेशन ‘अ‍ॅप’ मार्फत प्रवासी आपल्या सोयीनुसार कोणत्याही ठिकाणावरून राज्य परिवहन फे-यांचे आरक्षण करू शकतील. अमूल्य वेळेची बचत करून तत्पर सेवा मिळण्यासाठी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.