ठाकऱ्यांची भावी पिढी!

उलथापालथ, मग ती नैसर्गिक असो की मानवी, सुरळीत चाललेले जीवन उद्ध्वस्त करीत असते. त्सुनामीसारखी घटना असो की युद्ध, मानवी जीवनावर त्यांचे दूरगामी परिणाम होत असतात. अशा स्थितीत होरपळून निघालेला समाज पुन्हा धडपडत, चाचपडत स्थैर्याच्या दिशेने कूच करू लागतो. उलथापालथीच्या गर्भात आशेचे बीज असते. परंतु ते अंकुरण्यासाठी ते जमिनीत योग्य पद्धतीने गाडले जावे लागते. त्याची योग्य मशागत करावी लागते. त्यास आवश्यक तेवढे सिंचन व्हावे लागते आणि त्यास पूरक असे अनुकूल वातावरणही निर्माण व्हावे लागते. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीनंतर राज्यातील जनतेचा राज्यकर्त्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन अमुलाग्र बदलणार आहे. जे काही नाटक घडले ते नैतिक-अनैतिकतेच्या चष्म्यातून पाहिले जाणार. पक्षनिष्ठा, पक्षनेतृत्व, सत्तेसाठी चालणारी रस्सीखेच या सर्वांकडे बारकाईने पहात मत-मतांतरे तयार होणार. योग्य की अयोग्य अशा संभ्रमावस्थेत समाज गुरफटून गेला असताना एखादी सर्वसामान्य आणि लोक कल्याणकारी व्यवस्था निर्माण होईल काय या सकारात्मक विचाराने लोकमानसाचा ताबा घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर ठाकरे कुटुंबातील पुढच्या पिढीचे दोन युवक समाजात जाऊन आपल्या पक्षाचे म्हणणे मांडू पाहत आहेत. फुटीरगट स्थापन झाल्यामुळे हादरून गेलेल्या शिवसेनेतर्फे आदित्य ठाकरे आपल्या आजोबांनी स्थापन केलेल्या संघटनेची भूमिका मांडण्यासाठी दौरे करीत आहेत तर त्यांचे चुलत-चुलत बंधू आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित हे संवाद साधण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. या दोन तरुणांनी हाती घेतलेली मोहीम स्वागतार्ह असली तरी ज्या स्थितीत ते हा सारा प्रपंच करताना साहजिकच त्यांची मनोभूमिका ही वेगळी आहे. अपेक्षित परिणाम साधण्यासाठी त्यांनी कोणताही पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन न बाळगला तरच त्यांचे प्रयत्न परिणामकारक ठरतील.
आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामागे सत्ताहरणाचे मुख्य कारण आहे. ते शल्य उराशी धरून ते संवाद साधत आहेत. शिवसेनेत अशी उलथापालथ झाली नसती तर त्यांनी असे दौरे हाती घेतलेही नसते. सत्तेच्या माध्यमातून ते जनतेच्या अपेक्षांना उतरले असते. परंतु सत्तेचे सुकाणू हिरावून घेतले गेले असताना आणि तेही स्वकीयांकडून, त्याची बोच त्यांच्या विधानातून ठायी ठायी उमटत आहे. ही जखम तशी खोलही आहे. परंतु निसर्ग नियमाने जखम बरी होत असते आणि त्यावर खपलीही धरली जात असते. त्यासाठी जखम सारखी छेडत राहणे चांगले नाही. आदित्य नेमकी हीच चूक करीत आहेत. पक्ष सोडून गेलेल्या आमदारांबद्दल त्यांच्या मनात राग असणे स्वाभाविक आहे. परंतु तो उठसूठ व्यक्त करण्यात काय हशील आहे? त्यापेक्षा पक्षाची आगामी काळातील भूमिका, जनतेचे प्रश्न सोडवण्याबाबतचा आराखडा आणि उपाययोजना, अस्थिर झालेले वातावरण स्थिर करण्यासाठी भविष्यात उचलली जाणारी पावले, पक्षाची तत्वप्रणाली-मग तो मराठी अस्मितेचा मुद्दा असो की भूमिपुत्रांच्या सामाजिक- आर्थिक उत्कर्षाची योजना यावर आदित्य यांनी अधिक बोलले पाहिजे. राग गिळून एक आश्वासक नेतृत्व सिद्ध करण्याचा परिपक्वपणा शिवसेनेला योग्य मार्गाने पुढे नेऊ शकेल. पक्षाला झालेली इजा आणि व्यक्तिगत दुःख यांना गोंजारत बसणे विरोधी पक्षांना हवेच आहे. आदित्य सध्या या सापळ्यात तर अडकत नाहीत?
अमित ठाकरे यांना तुलनेने मनस्तापाचे ओझे नाही. त्यामुळे त्यांचे दौरे प्रामुख्याने संवाद साधण्यासाठी आहेत. त्यात पूर्वग्रह दूषितपणाचा लवलेश नाही. अशावेळी आपले नेतृत्व ( आणि वक्तृत्व) पिताश्री राज ठाकरे यांच्याप्रमाणे धारधार करण्याची त्यांना या ‘एक्सरसाइज’मध्ये सुवर्णसंधी आहे. खरी शिवसेना कोणती हा मुद्दा मनसे स्थापनेनंतर पुढे आला होता. आता आणखी एक सेना राज्याच्या क्षितिजावर प्रकट झाल्यामुळे तोच मुद्दा पुन्हा डोके वर काढू पाहत आहे. अमित ठाकरे यांनी ताज्या घडामोडींना दूर ठेवून संवाद साधायला हवा. कोऱ्या पाटीवर मनसेची अक्षरे, त्यांची संकल्पना, उद्दिष्टे वगैरे मांडायला हवी. ही वेळ मनसेला बळकटी देण्याची नसून स्वतः अमित ठाकरे यांना पाय घट्ट रोवून आपल्या भावी कारकिर्दीची मुळे घट्ट करण्याची आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख घराण्याचे सदस्य असलेले हे दोन तरुण त्यांच्या वयोगटाची राजकारण्यांकडे बघण्याची भूमिका समजून घेतील तर बरे होईल.
स्वातंत्र्य संग्रामात क्रांतीची ज्योत हाती घेणारे तरुण होते, जुलमी ब्रिटिशांच्या डोळ्यात डोळे घालून हसत हसत फास गळ्यात घालून घेणारे तरुणच होते, बलिदानाच्या या परंपरेचे पडसाद आपण स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही पाहिले. काळानुरूप त्याची तीव्रता कमी झाली. मिशनची जागा कमिशनने घेतली. राजकारणात तरुण शिरु लागला. परंतु यथावकाश त्यांचे हेतू दूषित होऊ लागले. राजकारणातील अवगुण ते अंगीकारू लागले. समाजहीत बासनात गुंडाळून ठेवले गेले. आदित्य आणि अमित तसेच त्यांच्यासारख्या हजारो तरुणांनी समाजाच्या या दृष्टिकोनात बदल घडवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. ती काळाची गरज आहे. त्याच त्या मळलेल्या वाटेने मार्गक्रमण केले तर मुक्काम ठरलेला आहे. त्याचा जनतेला विट आला आहे.
राजकारणाबद्दलचा राग असेल, तिटकारा असेल, त्याबद्दल मतभेद असतील, त्यातील खटकणारा फोलपणा असेल, विकासाच्या नावाने चालणारे गैरव्यवहार असतील, प्रशासनाला लागलेली कीड असेल किंवा एकूणच ‘सिस्टीम फेल्युअर’ मुळे आलेली हतबलता असेल यावर या दोघा तरुणांनी आपले विचार मांडायला हवेत. त्यावर त्यांच्या मनातील कृती कार्यक्रम सांगायला हवा. तसेच झाले तर त्यांचे नेतृत्व झळाळून निघेल आणि महाराष्ट्राचे भवितव्य उजळून निघेल.