उदंड झाले फेरीवाले !

कागदोपत्री १,२३४; प्रत्यक्षात २५ हजारावर

ठाणे : ठाणे महापालिकेच्या आवाहनानंतर १,२३४ फेरीवाल्यांनी प्रशासनाकडे कागदपत्रांची पूर्तता करून नोंदणी करून घेतली आहे. प्रत्यक्षात मात्र शहरात २५ हजारहून जास्त फेरीवाले रस्त्यावर आणि पदपथावर व्यवसाय करत आहेत, त्यामुळे ठाण्यातील रस्ता कोंडीची समस्या सुटणार कशी, असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे.

फेरीवाला धोरणामध्ये फेरीवाल्यांना जागा निश्चित करून त्याच ठिकाणी अधिकृत फेरीवाल्यांनी बसणे अपेक्षित असताना ठाण्यात आज गर्दीच्या ठिकाणी मग ते स्टेशन असो, हॉस्पिटल असो किंवा शाळा असो, अशा अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनी अनधिकृतपणे आपले बस्तान मांडले आहे. हे फेरीवाले केवळ ठाणे शहरातीलच नव्हे तर ठाण्याच्या बाहेरील कुर्ला, भिवंडी, असे बाहेरचे फेरीवाले येऊनही या ठिकाणी प्रशासनाच्या नाकावर टिचून आपला व्यवसाय करत आहेत. २०१९ मध्ये ठाणे महापालिकेने जो सर्व्हे केला त्या सर्व्हेच्या आधारे ठाणे शहरात केवळ सहा हजार फेरीवाल्यांचा सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये केवळ दोन हजार फेरीवाल्यांनी आपले पुरावे प्रशासनाकडे जमा केले असल्याचा दावा त्यावेळी प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आला होता. आश्चर्यांची बाब म्हणजे कोरोना काळात फेरीवाल्यांची संख्या एवढी वाढली असून आजच्या घडीला ठाणे शहरात २५ हजारांपेक्षा अधिक फेरीवाले आपला व्यवसाय करत आहेत. ठाणे महापालिकेकडे देखील या फेरीवाल्यांची नोंद नाही.

ठाणे महापालिकेने आता २०१६ आणि २०१९ च्या सर्वेक्षणाचा आधार घेऊन ज्यांनी योग्य पद्धतीने कागदपत्रांची पूर्तता केली अशा फेरीवाल्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये ज्या फेरीवाल्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत, त्यात काही दुरुस्ती असल्यास फेरीवाल्यांना ती संधी मिळणार आहे. काही नावे दोनदा आली असल्यास त्याही दुरुस्त्या करता येणार असून आणखी फेरीवाल्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ मिळणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

नौपाडा-कोपरी (नौपाडा विभाग ) – २१५
नौपाडा-कोपरी – (कोपरी विभाग) – ५९
वागळे – १०४
लोकमान्य-सावरकर नगर -१७३
वर्तकनगर -१८५
माजिवडा- मानपाडा – १०४
उथळसर -१७९
कळवा -९०
मुंब्रा – ८४
दिवा – ४१
एकूण – १,२३४

ज्या फेरीवाल्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे अशा फेरीवाल्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये काही दुरुस्ती असल्यास फेरीवाल्यांना हरकती सूचना मांडता येणार आहेत, अशी माहिती अतिक्रमण उपायुक्त जी.जी गोदापुरे यांनी दिली.