निष्ठा यात्रेला माजी नगरसेवक गैरहजर
भिवंडी : धर्माचा भेदभाव न करता भाषेचा व जातीपातीचा भेदभाव न करता आपण विकासाची कामे करीत आलो आणि महाराष्ट्राची सेवा करीत आलो. हे करीत असताना राजकारण कमी केले. राजकारण आपल्याला जमले नाही, म्हणून ही वेळ आपल्यावर आली आहे, असे माजी पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी भिवंडी येथील निष्ठा यात्रेत सांगितले.
भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पान्जली वाहून त्यांनी भिवंडीतील सेना भवनातील नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उदघाटन केले. आणि सेनाभवनाबाहेरील स्टेजवरून शिवसैनिकांशी संवाद साधला. या प्रसंगी शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, सेनेचे माजी सेक्रेटरी कृष्णकांत कोंडलेकर, महानगरप्रमुख श्याम पाटील, माजी आमदार रुपेश म्हात्रे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष इरफान भुरे आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र शिवसेनेच्या तिकिटावर गेल्या दहा ते तीस वर्षांपासून निवडून येत असलेले नगरसेवक गैरहजर राहिल्याने शिवसैनिकांमध्ये एकच चर्चेचा विषय बनला होता. त्याचप्रमाणे शिवसेनेचे शहरप्रमुख सुभाष माने हे देखील या कार्यक्रमास उपस्थित नव्हते. या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले कि, शिवसेनेचे ब्रीदवाक्य हेच आहे कि वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण असे आहे. त्यामुळे अंतर्गत विरोधकांच्यावर कारवाई केली नाही.
स्वतःच्या आमदार खासदारांवर लक्ष्य ठेवले नाही. त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्या विश्वासाने आपल्याला धोका दिला आहे. मात्र शिवसैनिक आमच्यावर प्रेम करतात म्हणून आम्ही नेहमी शिवसैनिकांवर विश्वास ठेवलेला आहे. त्यांनी केलेला हा उठाव अथवा बंड नव्हते तर गद्दारी होती, असे सांगत शिवसैनिकांना मार्गदर्शन केले आणि पुढील दौऱ्यासाठी आदित्य ठाकरे शहापूर येथे रवाना झाले.