ठाणे : पावसाळा सुरु होण्याआधी आणि पाऊस सुरु झाल्यानंतरही मुंबईकडे जाणा-या ‘हायवे’वरील कोपरी मार्गावर पडलेल्या खड्ड्यांना झाकण्यासाठी एमएमआरडीएने दोन ट्रक भरून पेव्हर ब्लॉक्स आणले असल्याचे निदर्शनास आले. जणू ब्लॉक्सचा ‘गालिचा’ अंथरुन खड्ड्यांची ‘मलमपट्टी’ करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरवर्षीच्या पावसात तीन हात नाका ते कोपरीपर्यंतच्या ‘हायवे’ची अक्षरश: चाळण होते. येथे २४ तास वाहनांची ये-जा होत असते. त्यामुळे हायवेवर खड्डे होणे हे नेमेची झाले आहे. यावर्षी पहिल्याच दिवसापासून तुफान पाऊस सुरु झाल्यानंतर महामार्गावर लहान-मोठे खड्डे पडण्यास सुरुवात झाली. कोपरीच्या पुलापासून ते आनंदनगर हद्दीपर्यंत रस्ता खराब झाला आहे. पावसानंतर डांबर निघून गेल्यामुळे एमएमआरडीएने मुंबईकडे जाणा-या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना बुजवण्याचे काम गेल्या ५-६ दिवसांपासून सुरु केले आहे.
पाऊस सुरुच असल्यामुळे आता हायवे पूर्ववत् करणे अशक्य असल्याने ‘एमएमआरडीए’ ने नियुक्त केलेल्या कंत्राटदारांच्या अभियंत्यांनी पावसामुळे उखडलेले मास्टिक आणि त्याखालचा ‘बेस’ पोकलेनच्या सहाय्याने खरवडून काढला आहे. तो हायवेच्या एका बाजूला सारुन, त्यावर पेव्हर ब्लॉक लावण्याकरीता बारीक खडी पसरली आहे. त्यावर पेव्हर ब्लॉक एकमेकांमध्ये लावण्याच्या कामाला गेल्या दोन दिवसांपासून सुरुवात केली आहे. पावसाची छोटी किंवा मोठी सर येवो, पेव्हर ब्लॉक्सचा एक मोठा पट्टा बसवण्यासाठी अभियंते व कामगार कार्यरत आहेत.
ही कामे पावसात सुरु असल्यामुळे पेव्हर ब्लॉक्सच्या खाली साचलेल्या पाण्याचा निचरा होण्याकरीता कोणतीच यंत्रणा उपलब्ध नसल्याने काही कामगार घमेल्याच्या सहाय्याने हे पाणी काढण्याचा प्रयत्न करतात तरीही पाणी तेथेच साचलेलेच असल्याचे निदर्शनास आले. मात्र यामुळे ‘ब्लॉक्स’ घट्ट न बसता सुटून हलू शकतात. पावसाळ्यात रस्त्यावर बसवलेले पेव्हर हा एक जुजबी उपाय आहे. या पेव्हरवरुन मोठी वाहने आणि कार गेल्यानंतर हे ‘ब्लॉक्स’ हमखास हलतात. त्यावरुन जाणा-या दुचाकी घसरुन चालकाचा अपघात होऊ शकतो, असे एका अभियंत्याने मान्य केले.