उल्हासनगर : उल्हासनगर मनपा मुख्यालयाच्या आवारात वाहनांसाठी असलेले पार्किंग चिखलमय झाले असून त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात ही समस्या निर्माण होत आहे मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. मनपा मुख्यालयाच्या इमारतीच्या मागे वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी मनपाचे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक, पत्रकार व इतर व्यक्ती आपली वाहने उभी करतात. काही दिवसांपूर्वी मनपा प्रशासनाने मुख्यालयाबाहेर असलेल्या रस्त्यावर वाहने लावण्यास मनाई केली होती त्यामुळे या पार्किंगच्या जागेत आणखी मोठ्या प्रमाणात वाहने उभी केली जात आहेत.
हे संपूर्ण पार्कींगचे आवार दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील चिखलमय झालेले आहे. वाहनांच्या येण्या-जाण्याने काही ठिकाणी खड्डे झाले असून वाहनचालकांना खड्डे व चिखलातून मार्ग काढून वाहने पार्क करण्यासाठी व आणण्यासाठी जावे लागते. रोजच्या या त्रासामुळे वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत प्रशासन मात्र या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत. या संदर्भात मनपाचे उपायुक्त अशोक नाईकवाडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.