पुणे-मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस पूर्ववत
ठाणे : पुणे-मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेसची सेवा २५ जुलैपासून पूर्ववत होणार आहे आणि डब्यांचे एलएचबीमध्ये रूपांतर करून या ट्रेनमध्ये ‘विस्टाडोम कोच’ सुरू करण्यात येईल. गेल्या काही दिवसांपासून ‘वरुण राजा’ धो धो कोसळत असल्यामुळे या गाडीने जाणा-या व येणा-या प्रवाशांना ‘ न भिजता’ पाऊस अनुभवता येणार आहे.
‘व्हिस्टाडोम कोच’ सुरू झाल्यानंतर म. रेल्वेकडे आता चार गाड्या विस्टाडोम कोचसह धावणार आहेत. मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई-पुणे डेक्कन क्वीन आणि आता मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस या चार गाड्या आहेत.
12125 एक्सप्रेस २५ जुलैपासून छशिमट येथून दररोज सायंकाळी ४.२५ वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री ७.५० वाजता पोहोचेल. 12126 एक्सप्रेस २५ जूलैपासून रोज सकाळी ०७.५० वाजता पुण्याहून सुटेल आणि छशिमट येथे त्याच दिवशी सकाळी ११.२५ वाजता पोहोचेल.
प्रवाशांचा १०० टक्क्यांहून अधिक प्रतिसाद
पावसाळ्यात ‘व्हिस्टाडोम’ गाडीतून छशिमट ते पुणे, पुणे ते छशिमट आणि छशिमट ते मडगाव आणि परतीचाही प्रवास ‘व्हिस्टाडोम’मधून करण्याचा आनंद लुटण्यासाठी दख्खनची राणी, दख्खन एक्स्प्रेस, छशिमट जनशताब्दीलाही ‘व्हिस्टाडोम’ जोडण्यात येणार असल्याचे समजल्यानंतर प्रवाशांनी उत्स्फुर्तपणे १०० टक्के प्रतिसाद दिला. एप्रिल, मे आणि जुन २०२२ मध्ये धावणा-या ‘व्हिस्टा’चे आरक्षण १०० टक्के झाले आहे. ‘दख्खनची राणी’ ला १००. ४१ टक्के, ‘दख्खन एक्स्प्रेस’ला १००.८३ टक्के आणि ‘छशिमट- मडगाव जनशताब्दी’लाही दोन्ही गाड्यांपेक्षा जास्त म्हणजे, १०२.४२ टक्के प्रतिसाद मिळाला आहे.
‘व्हिस्टाडोम’मुळे ‘दख्खन एक्स्प्रेस’ला ६२ लाख ५१,४२१ रुपये, ‘दख्खनची राणी’ ला ६८ लाख ७६,७६३ आणि ‘छशिमट-मडगाव-छशिमट’च्या प्रवासातून एक कोटी ७१ लाख ७२,१०६ रुपयांची व तीनही पावसाळी सेवांमुळे मध्य रेल्वेच्या तिजोरीत तीन कोटी तीन लाख २९० रुपये जमा झाले आहेत.