रस्त्यांवर पुन्हा खड्डे, खडीचा पसारा
ठाणे : ठाणे महापालिकेसह विविध प्राधिकरणांनी आपल्या मालकीच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यास सुरवात केली आहे. यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे, मात्र पावसामुळे खडी वाहून खड्डे पुन्हा उघडे पडू लागले आहेत.
ठाणे महापालिका हद्दीत पहिल्या पावसात ७९३ खड्डे पडल्याची माहिती समोर आली होती. या खड्ड्यांचे क्षेत्रफळ ४७३ चौरस मीटर एवढे दिसून आले आहे. त्यातील ६२० खड्डे बुजविण्यात आले असून १६३ खड्डे बुजविण्याचे शिल्लक असल्याची माहिती पालिकेने दिली होती. त्यानुसार खड्डे भरण्यात आल्यानंतर सोमवारी झालेल्या पावसाने हे रस्ते पुन्हा वाहून गेले असल्याचे चित्र शहराच्या विविध भागात दिसत आहे. खड्डे कसे बुजवावे यासाठी मुंबई महापालिकेने देखील महापालिकेकडून काही दिवसांपूर्वी धडे घेतले होते. असे असतांनाच ठाणे महापालिकेच्या खड्डे बुजवा मोहीमेचे पितळ उघडे पडल्याचे दिसून आले आहे. इतर प्राधिकरणांच्या माध्यमातून देखील काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक, डांबरीकरण, कोल्ड मिक्स या तंत्रज्ञानांनी खड्डे बुजविण्यात आले, मात्र अवघ्या एका दिवसात त्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडल्याचे दिसून आले.
ठाणे महापालिकेने खड्डे बुजविण्यासाठी अडीच कोटींची तरतूद केली आहे. त्यानुसार डब्ल्युबीएम, कोल्ड मिक्स, पेवर ब्लॉक, कॉंक्रीटीकरण, डांबरीकरण आदी पध्दतीने हे खड्डे बुजविण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले. परंतु सोमवारी झालेल्या पावसात हे सर्वच तंत्रज्ञान पाण्यात वाहून गेल्याचे दिसून आले आहे.
त्यातही काही ठिकाणी महापालिकेने भर पावसात कोल्ड मिक्सचा वापर केला होता. त्यातील काही ठिकाणचे कोल्ड मिक्स उखडल्याचे दिसून आले आहे. याशिवाय इतर प्राधिकरणांनी देखील या तंत्रज्ञानाचा वापर मुख्य हायवेवर केला होता. मात्र ते कमकुवत ठरल्याचे दिसून आले. त्यावरुन वाहनांचा मारा अधिक झाल्याने त्या भागात पुन्हा खड्डे पडले. आनंद नगर चेकनाका येथे बसविण्यात आलेले पेव्हर ब्लॉक उखडले होते. तर काही ठिकाणी कॉंक्रीटीकरणाच्या माध्यमातून खड्डे बुजविण्यात आले होते. त्यावर पावसाचे पाणी पडू नये यासाठी प्लास्टीक देखील टाकण्यात आले होते. मात्र शाहु मार्केट परिसरात प्लास्टीकसह कॉंक्रीट देखील वाहून गेल्याचे दिसून आले आहे.