ठाणे : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये १८ जुलै ते १५ सप्टेंबर या कालावधीत संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या कालावधीत सर्व प्रकारच्या टँकर वाहतुकीला बंदी घालण्यात आली असल्याची माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये संध्याकाळी ६ वाजता ते सकाळी ६ वाजता या कालावधीत टँकरच्या माध्यमातून धोकादायक केमिकल वाहून नेऊन नदीच्या पात्रात सोडले जाते. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होऊन लोकांच्या आरोग्यास धोका व नदीतील जैवविविधतेवर परिणाम होतो. त्यामुळे 18 जुलै ते 15 सप्टेंबर 2022 या काळात डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्व प्रकारच्या टँकर वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी कळविले आहे.