ठाणे : आयसीएसई दहावी परीक्षेचा निकाल ९९.९७ टक्के लागला असून गतवर्षी २०२१ ला ९९.९८ टक्के निकाल लागला होता. यावर्षी परीक्षेस २ लाख ३१ हजार ६३ विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये मुलांपेक्षा मुली सरस ठरल्या आहेत. उत्तीर्ण होण्याचे मुलीचे प्रमाण ९९.९८ टक्के असून मुलांचे प्रमाण ९९.९७ टक्के आहे.
यावर्षी ठाण्यातील सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलचे ५०२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यातील चार विद्यार्थ्यांनी पहिल्या ५० मेरिट रँकर्समध्ये स्थान पटकावले. त्यातील पहिले आलेले ठाण्यातील विद्यार्थी आदित तांबे-९९.४, अक्षी टकले-९९.४, समर प्रधान-९९.४, सम्यक मोहपात्रा -९९.४ हे होते.
सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलच्या संचालक आणि प्रिन्सिपल रेवती श्रीनिवासन म्हणाल्या, बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीसाठी गेल्या दोन वर्षात त्यांनी केलेल्या अथक मेहनतीचे फळ त्यांना मिळाले आहे, याचा आनंद साजरा करण्याचा हा क्षण आहे. यावर्षी बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या आमच्या सर्व ५०२ विद्यार्थ्यांचा आम्हाला खूप अभिमान आहे. आमच्या चार विद्यार्थ्यांनी ९९.४% गुण मिळवले आहेत. सर्व विषयांमध्ये १०० गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. वापी येथील डॉ. विजयपत सिंघानिया स्कूलची तिसरी बॅच यंदा दहावीला होती आणि ९८.५% निकाल देऊन त्यांनी आमची मान उंचावली आहे.
कोरोना महामारीमुळे आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षा यावेळी दोन सेमिस्टरमध्ये घेण्यात आली. पहिली सेमिस्टर डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत झाली तर दुसरी सेमिस्टर २५ एप्रिल ते २३ मे २०२२ दरम्यान देशातील विविध केंद्रांवर झाली. यामध्ये पुण्यातील सेंट मेरी स्कुलच्या हरगुन कौर मथारू या विद्यार्थिनीने ९९.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला.