* एमएमआरडीएच्या उड्डाणपुलांवर १५,६१३ चौ.मीटरचे खड्डे
* सार्वजनिक बांधकाम, एमएसआरडीसी, राष्ट्रीय महामार्गावर १,७२५ चौरस मीटरचे खड्डे
ठाणे : ठाणे महापालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या एमएमआरडीएच्या उड्डाणपुलांवर तब्बल १५,६१३ चौरस मीटरचे खड्डे पडले असून सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्त्यांवर १,७२५ चौरस मीटरचे खड्डे पडल्याचे उघडकीस आले आहे. या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असताना वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागत आहे.
पहिल्या पावसानंतर ठाणे महापालिका हद्दीत ७९३ खड्डे पडल्याची माहिती समोर आली आहे. या खड्ड्यांचे क्षेत्रफळ ४७३ चौरस मीटर एवढे आहे. त्यातील ६२० खड्डे बुजविण्यात आले असून १६३ खड्डे बुजविण्याचे शिल्लक असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. आता पावसाने उघडीप घेतल्याने महापालिकेने खड्डे बुजविण्याची मोहीम वेगाने सुरु केली आहे. दरम्यान दुसरीकडे महापालिका हद्दीतून जाणाऱ्या इतर प्राधिकरणाच्या रस्ते, उड्डाणपुलांवर खड्डे जरी कमी दिसत असले तरी या खड्ड्यांचा आकार हा अधिकचा दिसून आला आहे. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ही माहीती पुढे आली आहे. त्यानुसार एकट्या एमएमआरडीएच्या उड्डाणपुलावर तब्बल १५,६१३ चौरस मीटरचे खड्डे पडले असल्याचे उघड झाले आहे. तर दुसरीकडे एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नॅशनल हायवे आदी प्राधिकरणांच्या रस्त्यांवर १७,७२५ चौरस मीटरचे खड्डे पडले आहेत.
इतर प्राधिकरणाच्या मालकीच्या रस्त्यावरच्या खड्ड्यांची संख्या कमी दिसत असली तरी देखील खड्ड्यांचा आकार हा मोठा असल्याने साकेत, खारीगाव टोलनाका आदींसह इतर मार्गावर मागील काही दिवसापासून याच मोठ्या खड्ड्यांमुळे वाहतुक कोंडी झाल्याचे दिसून आले आहे.
या प्राधिकरणांकडून देखील खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून खारीगाव टोलनाक्यासह साकेत उड्डाणपुलासह महापालिका हद्दीतून जाणाऱ्या इतर पुल आणि रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु झाल्याची माहिती संबंधित यंत्रणांनी दिली आहे. त्यामुळेच सोमवारी साकेत पुलावरील वाहतुक कोंडी कमी झाल्याचे दिसून आले.
प्राधिकरण – खड्ड्यांचा आकार – (चौरस मीटर) खड्ड्यांची संख्या
ठाणे महापालिका – ४७३ १६३
एमएमआरडीए – १५,६१३ ५६
एमएसआरडीसी – ५८ १२
सार्वजनिक बांधकाम विभाग – ११९ १८
नॅशनल हायवे – १५४८ ८