कोपरी-वागळेला दोन दिवसात तर घोडबंदर-दिव्याला प्रतिक्षा

वाढीव पाणी कधी मिळणार?

ठाणे : मुंबई महापालिकेकडून कोपरी आणि वागळेला मिळणारे २० दशलक्ष लिटर वाढीव पाणी दोन दिवसात मिळण्याची शक्यता असून लघु पाटबंधारे विभागाने अद्याप नियोजन केले नसल्याने घोडबंदर आणि दिवा परिसरातील नागरिकांना वाढीव पाण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

ठाणे शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या आसपास असून चार स्त्रोतांमार्फत दररोज ४८५ दशलक्षलीटर पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु वा़ढत्या नागरिकरणामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने वाढीव पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. वाढती लोकसंख्या विचारात घेऊन ठाणे शहराला मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीद्वारे अतिरिक्त पाणी पुरवठा व्हावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री असताना उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. मात्र आता स्वतः मुख्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर त्यांनी ठाणे शहराची समस्या सोडवण्याच्या दृष्टीने वाढीव पाणी देण्याचा निर्णय घेऊन ठाणे शहराला मोठा दिलासा दिला आहे.

भातसा आणि बारवी धरणातून प्रत्येकी ५० दशलक्षलीटर तसेच मुंबई महापालिकेच्या कोट्यातील २० दशलक्षलीटर पाणी देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यानंतर ठाणे महापालिका पाणी पुरवठा विभागाने मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीवरून कोपरी, किसननगर आणि वागळे इस्टेट या भागांना वाढीव २० दशलक्षलीटर पाणी देण्यासाठी जलवाहिनी जोडणीची कामे हाती घेतली असून यामुळे या तिन्ही भागांना येत्या दोन दिवसांत पाणी मिळणार असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.

मुंबई महापालिकेकडून मिळणाऱ्या २० दशलक्षलीटर या वाढीव पाण्याचे नियोजन कोपरी, वागळे इस्टेट आणि किसननगर भागात करण्यात येणार आहे. यानुसार किसननगर, भटवाडी भागाला चार दशलक्ष लीटर, वागळे इस्टेट येथील इंदिरानगर संप हाऊसवरून पाणी पुरवठा होणाऱ्या भागांना १० दशलक्ष लीटर आणि कोपरी, आनंदनगर भागाला सहा दशलक्ष लीटर असे वाढीव पाणी मिळणार आहे. कोपरी आणि आनंदनगर भागाला यापुर्वी २० दशलक्षलीटर इतके पाणी मिळत होते. नव्या नियोजनानुसार वाढीव सहा दशलक्ष लीटर पाणी आनंदनगर भागाला दिले जाणार आहे. २० दशलक्ष लीटर पाणी पुर्णपणे कोपरी भागाला दिले जाणार आहे.

भातसा नदी पात्रावरील पिसे बंधाऱ्यातून महापालिका स्वत: च्या योजनेसाठी दररोज २१० दशलक्ष लीटर इतके पाणी उचलते. त्यासाठी त्याठिकाणी यापुर्वी ६०० अश्वशक्ती क्षमतेचे पाच पंप होते. त्यापैकी तीन पंपाद्वारे दररोज पाणी उपसा केला जात होता तर, उर्वरित दोन पंप राखीव ठेवले होते. भातसा धरणातून १०० दशलक्ष लीटर वाढीव पाणी मंजुर झाले तर, या पंपाद्वारे वाढीव पाणी उचलणे शक्य होणार नाही. त्यामुळे पालिकेने ११०० अश्वशक्ती क्षमतेचे पाच पंप बसविण्याचा निर्णय घेऊन हे पंप बसवून ते कार्यान्वित केले आहेत. यामुळे लघुपाटबंधारे विभागाकडून वाढीव पाण्याचे नियोजन प्राप्त होताच तेथून लगेचच पाणी उपसा करणे शक्य होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली आहे.