ठाण्यात शिवसेनेचे दोन गट एकमेकांसमोर शड्डू ठोकून!

शिंदे गट आक्रमक; ठाकरे गट ठाम

ठाणे : ठाण्यासह राज्यात शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा वाढत असताना ठाणे महापालिकेकडून होणाऱ्या कारवाईने उद्धव ठाकरे गट अस्वस्थ होताना दिसत आहे. तर या कारवाईशी राजकारणाचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. ठाणे शहरात शिंदे गट शक्तिशाली दिसत असून ठाकरे यांना पाठिंबा देणारी फळीही शहरात तयार होत आहे. या गटातील ठाकरे समर्थकही शिंदे गटात यावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठाम उभे असलेले ज्येष्ठ माजी नगरसेवक दशरथ पालांडे यांच्या मुलावर दोन दिवसांपूर्वी बेकायदा बांधकामाचे कारण दाखवत पालिकेने कारवाई केली. त्यानंतर रविवारी शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटकपदी नियुक्ती झालेल्या समिधा मोहिते यांचे झुणका भाकरी केंद्र बेकायदा दाखवत कारवाई करण्यात आली. या दोन्ही प्रकरणात एमआरटीपीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राजकारणाशी या कारवाईचा संबंध नसल्याचा दावा पालिकेने केला असला तरी इतकी वर्षे प्रशासन झोपले होते का असा सवाल कारवाईग्रस्त उपस्थित करत आहेत.   समिधा मोहिते यांच्या झुणका भाकरी केंद्रावर कारवाई केल्यानंतर माजिवडा प्रभाग समितीमधील हिरानंदानी इस्टेट येथील यिक्की वाईन व माटो माटो या बारवरही कारवाई करण्यात आली. मोटो मोटो हा बार समिधा मोहिते यांचा मुलगा श्रद्धेश याचा असून ओपन स्पेसमध्ये दारू विक्री व हुक्का पार्लर सुरू असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे पालिकेने सांगितले आहे. या कारवाईसोबतच इतर आणखी दोघांना दणका देण्यात आला असून सोमवारी या सर्वांवर एमआरटीपीअंतर्गत गुन्हा दाखल होणार आहे. या कारवाईमुळे गेली अनेक महिने थंडावलेली पालिका प्रशासन एकदम अ‍ॅक्शन मोडवर आली असल्याचे भासत असले तरी यामागे शिंदे गटाचे दबावतंत्र असल्याचा आरोप होऊ लागला आहे.

धर्मवीर आनंद दिघे यांनी २५ वर्षांपूर्वी हे झुणका भाकरी केंद्र आपणाला मिळवून दिले होते. शासनाने झुणका भाकरी केंद्र बंद करून अनेक वर्षे झाली. या काळात प्रशासन झोपा काढत होते का, असा सवाल समिधा मोहिते यांनी उपस्थित केला आहे.

पालिका प्रशासनाच्या नियमित कारवाया सुरू असतात. समिधा मोहिते यांना अनेकवेळा नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या. पालिकेच्या मालमत्तेवर जी योजनाच बंद झाली आहे तिथे झुणका भाकरी केंद्राच्या नावावर ड्राईव्ह व्ह्यू हॉटेल सुरू होते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. यासोबत इतर अनधिकृत बारवरही कारवाई झाली आहे. त्यामुळे आमच्यावर कुणाचाही दबाव नसून हा आरोप बिनबुडाचा असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.