प्रवीण नागरे यांनी पाणी टंचाईवर सुचवल्या उपाययोजना
ठाणे : ठाणे महानगरपालिकेला रोज ४८५ एमएलडी पाणी मिळत असले तरी वाढते नागरीकरण आणि तांत्रिक दोषांमुळे ठाणेकरांना नेहमीच पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी घोडबंदर भागातील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण नागरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे १२ सूचना केल्या आहेत.
ठाण्याला एमआयडीसी, स्टेम, टीएमसी, मुंबई महापालिकाद्वारे ४८५ एमएलडी पाणी मिळते. दुसरीकडे ठाण्याची लोकसंख्या जवळपास २५ लाख असून वाढत्या नागरिकरणामुळे पाण्याची गरजही वाढत आहे. दरम्यान तांत्रिक अडचणींमुळे पाणी पुरवठा अनियमित होत आहे. यामुळे मागील सहा महिन्यांपासून ठाणेकरांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. टँकरसाठी सोसायट्यांना आणि कंपन्यांना दर महिन्याला लाखो रुपये खर्च करावे लागत असल्याचे प्रवीण नागरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. या पाणी टंचाईवर नागरे यांनी काही उपाय सुचवले आहेत. ठाणे महापालिकेला त्वरित २०० एमएलडी पाणी वाढवून मिळावे, पाण्याच्या टाक्या बांधाव्यात. प्रत्येक सोसायटीला त्यांच्या हक्काची जलवाहिनी मिळावी, गृहसंकुलांना एसटीपी पाणी वापरणे बंधनकारक करावे, नवीन बांधकामाला पाण्याच्या उपलब्धतेनुसारच परवानगी द्यावी, येऊरच्या हुमायून बंधाऱ्याची त्वरित पुनर्बांधणी करून त्यातील पाणी वागळे इस्टेटमधील कंपन्यांना वापरण्यास देण्याचा उपाय नागरे यांनी सुचवलं आहे.
नॅशनल पार्कमधून वाहून जाणारे पाणी अडवावे, पिसे धरणाचा विस्तार करावा, टेमघर वॉटर ट्रीटमेंट युनिटची क्षमता वाढवावी, जागोजागी होणारी पाण्याची गळती थांबवावी, सोसायट्यांना वॉटर हार्वेस्टिंग योजना बंधनकारक करावी आणि विनापरवानगीने घेतलेली नळ जोडणी त्वरित बंद करावी, असेही नागरे यांनी पत्रात सुचवले आहे.