झुणका भाकर केंद्रे झाली चायनीज सेंटर-किराणा दुकाने

उपवन परिसरात कारवाई; गायब झालेली केंद्रे रडारवर

ठाणे : गरिबांसाठी उपयुक्त ठरलेली झुणका-भाकर केंद्रे गायब झालेली असून त्या ठिकाणी चायनीज सेंटर आणि किराणा दुकाने दिसू लागली आहेत. उपवन येथील अटी-नियम तोडणाऱ्या झुणका-भाकर केंद्रावर अतिक्रमण विभागाने कारवाई केली असून शहरातील ही केंद्रे आता ठामपा प्रशासनाच्या रडारवर आली आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या आदेशाने अतिक्रमण कारवाई सुरु असून महापालिकेच्या अतिक्रमण(मुख्यालय) विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विशेष पथकाने आज रविवारी वर्तकनगर समितीमधील उपवन येथील समिधा मोहिते यांचे झुणका भाकर केंद्र सिल करून ताब्यात घेतले.

झुणका भाकर उपक्रम शासनाने बंद केला असून समिधा मोहिते यांनी तो चालू ठेवला व त्यात गुटका, सिगारेट तसेच चायनीज पदार्थ विक्रीस ठेवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यात तथ्य असल्याने कारवाई करण्यात आली असून माजिवडा प्रभाग समितीमधील हिरानंदानी इस्टेट येथील रिक्की वाईन व माटो माटो या बारच्या ओपन स्पेसमध्ये वाणिज्य दारूविक्री व हुक्का पिण्यासाठी वापर केल्यावरून कृष्णनी व श्रध्देश मोहिते यांच्या बारवर कारवाई करण्यात आली. तसेच उपवन येथील बॉम्बे डक बारची अनधिकृत शेड तोडण्यात आली, सदरचे हॉटेल प्रीतम रजपूत व संतोष रजपूत यांचे आहे.

सदरची कारवाई आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांच्या आदेशाने उपायुक्त गोदेपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विशेष पथका मार्फत करण्यात आली असून अनधिकृत बांधकाम प्रकरणी उद्या सोमवारी समिधा मोहिते, कृष्णानी व श्रध्देश मोहिते, प्रीतम रजपूत, संतोष रजपूत यांच्यावर एमआरटीपी अन्वये गुन्हे दाखल होणार आहेत. या कारवाईमध्ये माजिवडा व वर्तक समितीचे अधिकारी व कर्मचारी व पोलीस उपस्थित होते. यापुढे शहरातील जे झुणका भाकर केंद्र सुरू आहेत त्यांच्यावर व अनधिकृत बांधकामावर कारवाया सुरूच राहणार असल्याचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी स्पष्ट केले आहे.

युती काळात झुणका-भाकर केंद्रे चालवण्यासाठी अनुदान देण्यात येत होते, मात्र हळूहळू त्या जागी दुसरेच व्यवसाय सुरू करण्यात येऊन केंद्राच्या ठिकाणी व्यावसायिक दुकाने, गाळे सुरू झाले. आंबे-घोसाळे तलावाजवळील प्रवेशद्वाराजवळच असलेल्या झुणका-भाकरी केंद्राच्या ठिकाणी आता चायनीज सेंटर सुरू झाले आहे. शहरातील अशी केंद्रे महपालिकेने ताब्यात घेण्याची मागणी जागरूक नागरिक करत आहेत.