ठाणे : हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरवत पावसाने उशिरा हजेरी लावली असली तरी गेल्या काही दिवसांत पडत असलेल्या मुसळधार पावसाने ठाणे-मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलाव आणि धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. गतवर्षीपेक्षा यंदा जुलैमध्ये भातसा धरण दुपटीने भरल्याने पाणी कपातीचे संकट दूर झाले आहे.
शहापूर तालुक्यातील भातसा धरणात सध्या पाण्याची पातळी १३४.०८ मिटर असून मागील वर्षी याच काळात पाणी पातळी ११४.०६ मिटर एवढी होती. धरणात सध्या एकूण पाणी साठा 755.238 द.ल.घ.मी. म्हणजे ७६.५५ टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी याच काळात ३८५.१४८ द. ल.घ.मि. म्हणजे ३७.२७ टक्के पाणीसाठा नोंदवण्यात आला होता.
भातसा धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढत असून भातसा धरणाची पाणी पातळी, जलाशय परीचलन सुचीनुसार नियमित करण्यासाठी, भातसा धरणाची वक्रद्वारे येणाऱ्या काही दिवसात उघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामस्वरूप भातसा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग प्रवाहीत करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भातसा नदीच्या काठावरील विशेषतः शहापूर- मुरबाड रस्त्यावरील सापगाव पुल तसेच सापगाव व नदीकाठावरील नागरीकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत.