मुसळधार पावसाने अंबरनाथ शिधावाटप कार्यालय तुंबले

कर्मचारी आणि नागरिक त्रस्त

अंबरनाथ : गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने सखल जागी पाणी साचून नागरिकांचे हाल झाले, मात्र येथील जुने आणि धोकादायक असलेल्या शिधावाटप कार्यालयात पावसाचे पाणी शिरल्याने तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाण्यात काम करावे लागत आहे. कामानिमित्त येणाऱ्या लोकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

कल्याण-बदलापूर मार्गावर जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत असलेल्या कार्यालयातून शहराच्या शिधावाटपाचे काम चालते. मागील आठवड्यापासून जोरदार पर्जन्यवृष्टी झाली होती. यामुळे  ररस्त्यावरील पावसाचे पाणी कार्यालयात शिरल्याने  कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना तसेच शिधावाटपाबाबत कामानिमित्त आलेल्या नागरिकांना पाण्याचा त्रास होत आहे. रोज सकाळी ते सायंकाळी पाण्यात काम करावे लागल्याने  अधिकाऱ्यांच्या पायाला जखमा झाल्या आहेत.

कल्याण-बदलापूर महामार्ग सिमेंट काँक्रीटचा झाल्याने रस्त्याची उंची वाढली. एमएमआरडीएने रस्ता तयार करताना रस्त्याच्या बाजूला पाणी जाण्यासाठी वाट केली नसल्याने पावसाचे आणि आजूबाजूला साचलेल्या पाण्याचा कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. कार्यालयातील साचलेल्या पावसाच्या पाण्याबाबत नगरपालिकेकडे तक्रार केली असता नगरपालिकेचे अधिकारी सुनीलकुमार जाधव यांनी यंत्राद्वारे पाण्याचा निचरा केल्याचे सांगितले. मात्र पावसाने विश्रांती घेऊनही कार्यालयातील पाणी कमी होत नसल्याने कर्मचारी त्रस्त झाले आहेत.