जिल्ह्यात ४४ लाखाहून जास्त नागरीक बुस्टर डोससाठी पात्र

ठाणे : जिल्ह्यात १८ पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना शासकीय लसीकरण केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बुस्टर डोस आजपासून मोफत देण्यात येत आहे. जिल्ह्यात बुस्टर डोस घेण्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांची संख्या ४४ लाख ३९ हजार १६७ इतकी आहे.

लसीच्या दुसऱ्या डोसनंतर ६ महिने किंवा २६ आठवड्याचा कालावधी पुर्ण झालेले नागरीक प्रिकॉशन डोससाठी पात्र असणार आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. बुस्टर डोस घ्यायला येताना नागरिकांनी दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र व नोंदणी कृत मोबाईल सोबत असणे आवश्यक आहे. ऑनलाईन नोंदणी तसेच थेट लसीकरण केंद्रांवर जाऊनही हा डोस घेता येईल, असे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अंजली चौधरी यांनी सांगितले. पात्र नागरिकांनी बुस्टर डोस घ्यावेत असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा पाटील यांनी केले आहे.