विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : भारत अव्वल!

चँगवॉन : नेमबाजांच्या चमकदार कामगिरीच्या बळावर भारताने ‘आयएसएसएफ’ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेच्या पदकतालिकेत अग्रस्थान मिळवले. भारताने तीन सुवर्ण, चार रौप्य आणि एका कांस्यपदकासह एकूण आठ पदकांची कमाई केली. यामध्ये महाराष्ट्राच्या शाहूने सांघिक गटांमध्ये दोन सुवर्णपदके पटकावत आपली छाप पाडली.

दिवसाच्या सुरुवातीला भारताच्या अर्जुन बबुता, शाहू माने आणि पार्थ मखिजा या त्रिकुटाने १० मीटर एअर रायफल सांघिक गटात कोरियाला १७-१५ असे पराभूत करत देशासाठी तिसरे सुवर्णपदक जिंकले. अर्जुन आणि शाहूचे या स्पर्धेतील हे दुसरे पदक ठरले. एलाव्हेनिल व्हलारिव्हान, मेहुली घोष आणि रमिता यांनी कोरियाकडून १०-१६ अशी हार पत्करली. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात भारताने इटलीकडून १५-१७ असा पराभव पत्करल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दिवसाचे तिसरे रौप्यपदक भारताने १० मीटर एअर पिस्तूल महिला सांघिक गटात मिळवले.