ठाणे : ठाण्यातील एसटी प्रशासनाने दोन महिने अगोदरच बस आरक्षणाची सोय केल्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला. कोकणात जाण्यासाठी २८ जून ते २ जुलै दरम्यान तब्बल ३५० बसेस्च्या ऑनलाईन तिकिटांच्या बुकिंग करण्यास सुरुवात केली शिवाय ग्रुप बुकिंग करणा-या भाविकांकरीता अतिरिक्त ३५० बसेस् सोडण्यात येतील. भाविकांसाठी यंदाच्या वर्षी ११०० बसगाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती एसटीचे ठाणे विभाग नियंत्रक विनोद भालेराव यांनी ‘ठाणेवैभव’ला दिली.
तडाखेबंद पावसाला न जुमानता कोकणात गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली असताना ठाणे व विक्रोळी ते मुलुंडपर्यंत पसरलेल्या चाकरमान्यांनीही मध्य, कोकण रेल्वे आणि पश्चिम रेल्वेसह एस.टीच्या ‘लाल परी’च्या ऑनलाईन बुकिंगला चांगला प्रतिसाद दिल्याची माहिती ठाणे एस.टीमधील सूत्रांनी दिली. गेल्या काही वर्षांमध्ये कोकणात एसटीने जाणारे असंख्य प्रवासी असल्यामुळे ठाणे विभागातून तब्बल एक हजार ते अकराशे गाड्या कोकणात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पहिल्याच पाच दिवसांत ऑनलाईन आरक्षणाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. ब-याच बसेस ‘लाल परी’ असतील, असेही सांगण्यात आले.
कोकणात एसटीने जाणा-या भाविकांची सणाच्या दोन तीन-दिवस अगोदर कमालीची घालमेल सुरु होते. ती होऊ नये यासाठी ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या दरम्यान एसटीच्या ठाणे विभागातून चिपळूण, रत्नागिरी, गुहागर, साखरपा, देवगड, कणकवली, सावंतवाडी सिंधुदुर्ग आदी ठिकाणी या जादा बसेस् धावणार आहेत. मात्र ऐन उत्सवात कोकणात पोहचण्यासाठी २६ ते ३० ऑगस्ट आणि परतीच्या प्रवासाकरिता ४ ते ९ सप्टेंबर हा कालावधी आरक्षण असणार आहे. ठाणे विभागातून बोरिवली, मुलुंड, भाईंदर, ठाणे, भांडुप, कल्याण, डोंबिवली विठ्ठलवाडी या बस स्थानकांतून जादा बस सुटतील.
ठाणे विभागातून २८ जूनपासून व्यक्तिगत किंवा ग्रुप्सचे आगाऊ संगणकीय आरक्षण करण्याचीही व्यवस्था उपलब्ध करण्यात आल्याचेही भालेराव यांनी सांगितले. कोकणासाठी १००० जादा बसेस ठाणे विभागीय बस स्टॉपवरून सुटतील. ठाणे विभागातून २८ जून ते २ जुलै दरम्यान या बसप्रवासाचे आरक्षण झाले आहे. सर्वाधिक ठाण्याच्या दोन्ही बस आगारांमधून १३२ आणि १२८ गाड्यांचे, बोरिवलीतून १२१ बस आदी मिळून ६०० गाड्यांचे पहिल्या टप्प्यात नियोजन करण्यात अले. त्यापैकी ३५० बसचे ऑनलाईन आरक्षण सुरू झाले.
गणेशोत्सवाच्या एक आठवडा तर काही भाविकांची एक दिवस अगोदर कोकणात जाण्यासाठी घालमेल सुरु असते. त्यामुळे २६ ते ३० या काळात वेयक्तिक किंवा ग्रुप बुकिंग आरक्षणाच्या बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. गेल्यावर्षी ८५० बसेस कोकणात धावल्या होत्या, यंदाचा प्रतिसाद लक्षात घेऊन बसेसची संख्यावाढ केली जाईलच शिवाय बस आगारातील संगणकीय खिडकीवर किंवा ऑनलाइन पद्धतीने बस आरक्षण करता येणार आहे, असे ठाणे एस.टी विभाग नियंत्रक विनोद भालेराव यांनी ‘ठाणेवैभव’ला सांगितले.