पाणीकपात टळली; पाणबुड्यांनी काढला पंपाजवळचा कचरा

ठाणे : पिसे बंधाऱ्यातील पाणी उपसा करणाऱ्या पंपाजवळ कचरा मोठ्या प्रमाणात अडकल्याने ठाण्याला होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला होता. हा गाळ आणि कचरा पाणबुड्यांनी काढल्याने तूर्त पाणीकपात टळली आहे.

ठाणे महापालिका चार स्त्रोतांमार्फत शहरात दररोज ४८० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करते. त्यापैकी २२० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा महापालिका स्वत:च्या योजनेतून करते. त्यासाठी पालिका भातसा नदीवरील पिसे बंधाऱ्यातून पाणी उचलते. या बंधाऱ्यातून पाणी उपसा करण्यासाठी पालिकेने पाच पंप बसविले असून त्यापैकी तीन पंप सुरु ठेवण्यात येतात. तर, उर्वरित दोन पंप राखीव ठेवण्यात आले आहेत. अतिवृष्टीमुळे भातसा नदीला पूर आला आहे. यामुळे नदीवरील पिसे बंधाऱ्यावरून पाण्याचा उपसा करणाऱ्या पंपाच्या मुखाशी मोठ्या प्रमाणावर गाळ आणि कचरा जमा झालेला आहे. यामुळे पंपाद्वारे पुरेशा पाण्याचा उपसा करणे शक्य होत नव्हते. त्याचा परिणाम शहरातील पाणी पुरवठ्यावर झाला आहे.

ठाणे महापालिका पाणी पुरवठा विभागाने दोन पाणबुड्यांच्या मदतीने गुरुवारी दुपारी सकाळी १० वाजता पंपाच्या मुखाशी अडकलेला कचरा आणि काढण्याचे काम हाती घेतले. दोन तासांच्या अवधीनंतर तीन मीटर खोल असलेल्या पंपाच्या मुखाशी अडकलेला कचरा काढण्यात पाणबुड्यांना यश आले. हा कचरा पुन्हा मुखाशी अडकू नये म्हणून तो बंधाऱ्यातून बाहेर काढून टाकण्यात आला आहे. यानंतर टप्प्याटप्प्याने तीन पंपाद्वारे पाणी उपसा करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

पाणबुड्यांच्या साहाय्याने पिसे बंधाऱ्यांतील पंपातील कचरा आणि गाळ काढण्यात आला असला तरी, पुन्हा नदीला पूर आल्यास हा गाळ आणि कचरा अडकू शकतो. त्यामुळे पुन्हा पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. सध्या हा कचरा काढण्यात आला असल्याने शुक्रवारी सकाळ पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे, अशी माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.