मराठीमधील आणखी एक सुपरहिट चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज, प्रविण तरडेंची महत्त्वपूर्ण भूमिका

२००८मध्ये प्रदर्शित झालेला ‘दे धक्का’ चित्रपट तुम्हाला आजही आठवत असणारच. मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम या त्रिकुटाने या चित्रपटामध्ये कमाल केली. आता हीच धमाल प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. ‘दे धक्का’ चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ जाधवने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे चित्रपटाचं नवं पोस्टर शेअर केलं आहे.

आषाढी एकादशीनिमित्त सिद्धार्थने चित्रपटाचं नवं पोस्टर शेअर केलं. चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये ‘दे धक्का २’मधील कलाकार मंडळी दिसत आहेत. विशेष म्हणजे अभिनेते-दिग्दर्शक प्रविण तरडेही या चित्रपटात दिसणार आहेत. सिद्धार्थने चित्रपटाचं पोस्टर शेअर करत म्हटलं की, “आज पंढरीची वारी, ५ ऑगस्टला लंडनवर स्वारी! महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर दिग्दर्शित ‘दे धक्का २’ तुमच्या जवळच्या सिनेमागृहात ५ ऑगस्टपासून. “थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय…घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय” म्हणजेच ‘दे धक्का २’ ५ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच प्रेक्षकांमध्ये ‘दे धक्का २’बाबत उत्सुकता वाढली होती. या चित्रपटात मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम, गौरी इंगवले, मेधा मांजरेकर आदी कलाकार मुख्य भूमिकेमध्ये काम करताना दिसतील.

चित्रपटाच्या टीझरमध्ये काळी-पिवळी टॅक्सी नव्हे तर कार दिसली होती. शिवाय चित्रपटाच्या दुसऱ्या भागात जाधव कुटुंबियांची लंडन वारी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी केलं आहे. तसेच अमेय खोपकर यांच्या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.